बुद्धांची शिकवण जगाला तारणारी:-सीईओ वर्षा ठाकूर

ताज्या बातम्या

नांदेड,बातमी24:-अडीच हजार वर्षापूर्वी जगाला जगण्याचा मार्ग तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी दाखविला, हजारो वर्षांनंतर ही बुद्धांनी जगाला दिलेले तत्वज्ञान हेच आपल्या जगण्याचा केंद्रबिंदू असून आपल्या जगण्याची प्रेरणा असल्याचे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.त्या बुद्ध पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या बुद्ध-भीम गीतांच्या कार्यक्रमाच्या समारोपावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.

डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल ऍण्ड कल्चरल मूव्हमेंट नांदेड व महाराष्ट्र बहुजन शिक्षक महासंघ नांदेडच्या वतीने बुद्धजयंतीनिमित्त बुद्ध पहाट या कार्यक्रमाचे आयोजन 16 मे रोजी करण्यात आले होते. यावेळी विनया व विजया जाधव सिस्टर्स यांच्या गायकीचा कार्यक्रम घेण्यात आला होता.

समारोपीय सत्रात बोलताना वर्षा ठाकूर म्हणाल्या, की आज जग तिसऱ्या युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचले आहे.जगाला तारण्याची शिकवण ही बुद्धाच्या तत्वज्ञानात आहे. बुद्धाचे तत्वज्ञान हेच आपल्या सर्वांच्या जगण्याचा आधार व मार्ग आहे. ही बुद्धांनी दिलेली शिकवण जगातील प्रत्येक माणुसमात्रा यांना लागू पडणारी आहे.त्यामुळे आपण प्रत्येकाने बुद्ध मार्ग आचरणात आणला तर आपल्या जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहू शकत नाही,असे ठाकूर यांनी आवर्जून सांगितले,यावेळी त्यांनी विनया व विजया सिस्टर्स यांच्या गायिकेचे ही भरभरून कौतुक करत त्यांच्य कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वागताध्यक्ष सुरेशदादा गायकवाड,संयोजक रोहिदास कांबळे,प्रमोद गजभारे,टी. पी.वाघमारे,नंदकुमार बनसोडे,संजय नरवाडे,बाबुराव कसबे,भगवान गायकवाड,किशोर अटकोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पूज्य भदंत विनय बोधीप्रिय थेरो आणि त्यांच्या पुज्यनिय भिख्खू संघाने धम्म संदेश दिला.सकाळी पाच वाजता सुरू झालेला शंकरराव चव्हाण सभागृह येथील कार्यक्रमास लोकांची मोठया संख्येने हजेरी होती.