आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी: जिल्हाधिकारी राऊत यांचे निर्देश

नांदेड

नांदेड,बातमी 24 :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली असून याचा भंग होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी आज जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची व तालुका प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली.

जिल्ह्यात नुकत्याच काही तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पाडल्या आहेत. अनेक भगाात राजकीय पक्षांचे बॅनर, पोस्टर्स व इतर साहित्य असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हे लक्षात घेता त्या-त्या तालुका पातळीवरील तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी योग्य ती खबरदारी घेऊन तात्काळ याबाबत कार्यवाही केली पाहिजे. आदर्श आचारसंहितेच्या ज्याबाबी नमूद केलेल्या आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करून कोणत्याही स्थितीत वैयक्तिक पातळीवरील तर्क वितर्काला प्राधान्य देऊ नका, असे त्यांनी बजावले. दिव्यांग मतदारांच्यादृष्टिने विचार करून मतदान केंद्रात अत्यावश्यक ते बदल करून घेणे आवश्यक आहे. सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी समन्वय ठेऊन योग्य ती वेळेवर कार्यवाही करण्याबाबत निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले.