गिन्नी माही यांच्या भीम गीतांनी जिंकली नांदेडकरांची मने संविधान हीच देशाची ताकद – प्रा. जोगेंद्र कवाडे

नांदेड

नांदेड,बातमी24:-रविवारी आयोजित करण्यात आलेल्या भीम महोत्सवात पंजाबी गायिका गिन्नी माही यांनी पहाडी आवाज भीम गीते गाऊन आंबेडकरी समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण केल्याने एकच जल्लोष बघायला मिळाला. तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांनी संविधान हीच देशाची ताकद असून संविधानामुळे देश टिकून राहील, त्यामुळे संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.


डॉ. बी आर आंबेडकर फाउंडेशनचे संयोजक बापूराव गजभारे यांच्या वतीने रविवार दि.17 रोजी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भीम महोत्सवाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जयदीप कवाडे, आमदार बालाजी कल्याणकर,मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, प्रवीण साले, रमेश सोनाळे, भन्ते पय्या बोधी,श्रीकांत गायकवाड, पंढरीनाथ बोकारे आदींची उपस्थिती होती. यावेळी समता गौरव पुरस्कार पत्रकार श्रीमंत माने, कृष्णाई जिल्हा पत्रकार पुरस्कार प्रल्हाद कांबळे, छायाचित्रकार पुरस्कार ज्ञानेश्वर सुनेगावकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


यावेळी बोलताना प्रा.कवाडे सर म्हणाले, की आज देशामधील संबंध परिस्थिती पाहता, चिंतेची बाब व्यक्त करणारी आहे.देश अबाधित राखायचा असेल तर संविधानाचे मूल्ये जपावे लागतील, तेव्हा 125 कोटी लोकसंख्येचा देश टिकून राहील, ही आखडता जपण्याचे काम फक्त संविधानात असून सर्वांचे याच योगदान महत्वाचे असल्याचे प्रा.कवाडे यांनी सांगितले.तत्पूर्वी प्रास्ताविक भाषणात बापूराव गजभारे यांनी पुढील वर्षापासून प्रज्ञावंत विद्यार्थी असा पुरस्कार देण्याची घोषणा करता टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी ओमप्रकाश पोकर्णा, बालाजी कल्याणकर, प्रवीण साले व ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने यांचीही भाषणे झाली.
गिन्नी माही यांनी बाबासाहेब को प्रणाम या गीताने गाण्याची सुरूवात करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. भीमराज की बेटी मै तो जयभीमवाली हु या गीतावर एकच जल्लोष झाला. अशी एकाहून एक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनवर प्रकाश टाकणार्‍या गिन्नी माही यांच्या गाण्यावर युवा वर्गाने ठेका धरल्याने बघायला मिळाले. या महोत्सवाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन पत्रकार राम तरटे यांनी केले.
एक व्यक्ती आणि… उत्कृष्ट नियोजन
अवघ्या चार ते पाच दिवसांमध्ये भीम महोत्सवाचे नियोजन व तयारी बापूराव गजभारे यांनी करून हा भीम महोत्सव यशस्वी करून दाखविला. महोत्सवाचे भव्य स्टेज, देखणा पुरस्कार सोहळा, सोबतच मान्यवरांची मोजकी भाषणे, महिला-पुरूषांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था व कडेकोट बंदोबस्त दिसून आला. नांदेडच्या इतिहासात आंबेडकरी भीम गीतांचा असा अभूतपूर्व महोत्सव तेही हजारो लोकांच्या प्रतिसादाने साजरा करण्याची किमया गजभारे यांनी करून दाखविली, याबद्दल अनेकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.