नवउद्योजकांपर्यंत शासकीय योजना  पोहचवा: – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

नांदेड

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात उद्योजकांना उभारी देण्यासाठी आणि नवीन उद्योग निर्मितीसाठी शासनाच्या विविध योजना नवउद्योजकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. याचबरोबर या योजनासंदर्भात उद्योजकांच्या मनात असलेल्या शंकांचेही तात्काळ निरसन करून प्रक्रिया गतीमान करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, प्रवीण खडके, औद्योगिक संघटनेचे शैलेश कराळे, आनंदे बिडवई, महेश देशपांडे, हर्षद शहा, एकनाथ जाधव तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

जिल्ह्यातील अनेक पदवीधर युवक-युवती आपल्या उद्योग व्यवसायाबाबत संधीच्या प्रतिक्षेत आहेत. नवीन स्टार्टअपच्या दृष्टिने अनेकांनी प्राथमिक माहिती व आवश्यक ती तयारीही करून ठेवलेली आहे. अशा गटांना शासनस्तराशी निगडीत जर काही अडचणी असतील तर त्या त्वरीत दूर करून त्यांना प्रोत्साहन देण्यासह योजनांचे बळ उपलब्ध करून दिले पाहिजे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केली. यादृष्टीने जिल्हास्तरावर परिसंवादाचे आयोजन करण्याबाबत जिल्हा उद्योग केंद्राला त्यांनी निर्देश दिले.

आपला नांदेड जिल्हा हा कृषिप्रधान जिल्हा आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत सिंचनाच्या सुविधा अनेक भागात आहेत. अनेक प्रगतीशील शेतकऱ्यांनी फलोत्पादनापासून इतर दर्जेदार कृषि उत्पादन घेतले आहे. कृषिपुरक उद्योगाच्या निर्मितीसाठी जे काही तांत्रिक कौशल्य व त्याबाबतची माहिती देण्यासाठी विद्यापीठ पातळीवर व कौशल्य विकास विभागातर्फे केंद्र असून याचा लाभ युवकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. उद्योगासंबंधी ज्या काही अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी दर तीन महिन्याला उद्योजक मित्रांची बैठक घेण्याचे त्यांनी उद्योग विभागाला सांगितले.