नांदेडच्या मातीशी जुळलेले ऋणांनुबंध विसरणे अशक्य: निरोप समारंभाच्या निमित्ता जिल्हाधिकारी डॉ. इटनकर भावूक

नांदेड

नांदेड, बातमी24ः मी लातूर जिल्हा परिषदमधून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माझी बदली झाली, तेव्हा  लातूरकर म्हणून नांदेडला आलो. आता नांदेड येथून नागपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून गेलो,असता नांदेडकर असा माझा उल्लेख केला जात आहे.या गोष्टीचा मला सार्थ अभिमान असून जिथे-जिथे मी काम केले,तिच माझी कर्मभूमी म्हणून वावरत आलो आहे. नांदेडच्या बाबतीत माझी जुळलेली नाळ कधीही तुटू  शकत नाही, याचे कारण म्हणजे, नांदेडमध्ये माझ्या मुलीचा जन्म झाला आहे, त्यामुळे माती व माणसांशी जुळलेले ऋणांनुबंध कधीही विसरणे अशक्य असल्याचे सांगताच जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या कडा पाणावल्या, या प्रसंगी संपूर्ण सभागृह भावूक झाले.

जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांची दहा दिवसांपूर्वी नागपूर जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने निरोप समारंभ शुक्रवार दि.2 सप्टेंबर रोजी नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या निरोप सभारंच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर,प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळमनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, सनदी अधिकारी किर्तीकुमार पुजार, डॉ. शालिनी इटनकर, आदींची उपस्थिती होती.

या वेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर म्हणाले, की नांदेड जिल्हाधिकारी म्हणून काम करणे एका प्रकारे आव्हान असत.त्यात कोरोनाचे उभे टाकलेले संकट होते. माझे वैद्यकीय शिक्षण झाल्याने संकटाशी कसा मुकाबला करावा, हे मला माहित होते. माझ्या शिक्षणाचा उपयोग कोरोनाच्या काळात काम करताना उपयोगी झाला. दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा दोनच तास पुरेल इतके ऑक्सिजन शिल्लक होते. त्या वेळी मी व पोलिस अधीक्षक शेवाळे यांनी ग्रीन कॅरिडोर करून शेवटचे दहा मिनिट ऑक्सिजन शिल्लक राहिला होता. तेव्हा ऑक्सिजन टँक जोडू शकलो. यात काही हलगर्जीपणा झाला असता, तर मोठया प्रमाणात जिवितहानी होऊन शेकडो लोक मृत्यूमुखी पडले असते. हा प्रसंग आजही डोळयासमोर आला तर अंगावर शाहारे येतात. यात बाबत मी कधीची आतापर्यंत उघडपणे बोलू शकलो नव्हतो, पण आजच्या प्रसंगाच्या निमित्ताने सांगायला काही हरकत नसल्याचे डॉ. इटनकर म्हणाले.

काम करताना वरिष्ठांच्या शिव्या खाव्या लागतात अन खालच्या मंडळींना शिव्या द्याव्या लागतात. मात्र या कुठेही कटुता किंवा राग अशी भावना नसते. मला चांगली टीम लाभली, सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे व मनपा आयुक्त सुनील लहाने यांची साथ लाभली. त्यामुळे जिल्ह्यालासाठी काहीतरी करू शकलो. असे गौरव्दगारी डॉ. इटनकर यांनी अधिकारी-कर्मचार्‍यांप्रती काढले.
गोदावरी नदीच्या पाण्यात मोठी ताकद आहे.माहुर येथील आई रेणुका मातेचे मंदिर, नांदेड शहरात श्री. गुरुगोविंदसिंघजी यांची पावनभूमीत काम करण्याचे भाग्य लाभले. यातून काम करण्याची प्रेरणा व उर्जा देणार नांदेड हे केंद्र ठरले. याच नांदेडमध्ये माझ्या मुलीचा जन्म झाला. त्यामुळे या मातीशी माझ्या परिवाराची नाळ जोडली गेली आहे. मी नौकरीच्या निमित्ताने कुठेही जाईल, मात्र नांदेडच्या भूमिशी माझी जुळलेली नाळ कधीही तुटली जाणार नाही, येथील लोकांशी माझा जिव्हाळा कायम राहील,आपल्या संपर्कात मी कायम असेल, आवश्यकता पडेल तेव्हा माझ्याशी संपर्क करू शकता, असे डॉ. इटनकर यांनी आश्वासित करताना त्यांच्या डोळयात अश्रू आले. या वेळी सभागृह भावूक झाल्याचे बघायला मिळाले.
—–
डॉ. इटकर संवादी अधिकारी-ठाकुर
डॉ.विपीन इटनकर हे नांदेड जिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट ठरले, शिवाय एक संवादी अधिकारी म्हणून त्यांचा विशेष उल्लेख करावा लागेल, सोबतच कामाच्या बाबतीत त्यांचे टाईम मॅनेजमेंटविषयी प्रशंसा करणे मला अधिक आवडेल, एक टीम वर्क म्हणून त्यांची अत्यंत चांगले काम केले. त्यामुळे डॉ. इटनकर यांना नांदेड जिल्हाधिकारी या नात्याने त्यांना कुणीही विसरू शकत नाही.असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर घुगे यांनी सांगितले.
——
डॉ. इटनकर म्हणजे संवेदनशील अधिकारी- शेवाळे
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कायद्या व सुव्यवस्था बाबत माझ्यासोबत कायम राहिले, जबाबदारी झटकणारा नसून जबाबदारी अंगावर घेऊन काम करणार अधिकारी त्यांच्या रुपाने आम्हाला बघायला मिळाला. जिथे-जिथे आपत्ती किंवा कायद्याचा प्रश्न निर्माण झाला. तिथे ते स्वतः भेट देऊन लोकांशी संवाद साधून प्रश्न मार्गी लावण्यात महत्वाची भूमिका बजावत, असे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी सांगितले. या वेळी महापौर जयश्री पावडे, प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सनदी अधिकारी किर्तीकुमार पुजार, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसीलदार किरण अंबेकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार आदींची भाषणे झाली. या समारंभाला जिल्हाभरातून अधिकारी-कर्मचारी हजर होते.

पूर्ण…
जयपाल वाघमारे, नांदेड.
मो. 9011127475