संविधान दिनानिमित्त आयोजित रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

नांदेड

नांदेड,बातमी 24 :- संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे नांदेड येथे महात्मा फुले पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळापर्यंत संविधान दिनाचे औचित्य साधून भव्य रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या रॅलीस हिरवी झेंडी दाखविली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार माळोदे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, समाज कल्याण अधिकारी बापु दासरी, अशोक गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीला अधिकार बहाल करणाऱ्या राज्यघटनेचा 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण स्विकार केला. भारताची स्वतंत्र राज्यघटना अंगिकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रतीही अर्पण केलेली आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचे व त्याचबरोबर सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय घटनेमुळे प्रत्येकाला मिळाले आहे. याचबरोबर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व दर्जा व संधीची समानता आपल्या संविधानाने दिलेली आहे. संविधानातील या मानवी मूल्यांचा जागर प्रत्येक व्यक्ती पर्यंत व्हावा या उद्देशाने आज संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या रॅलीसाठी विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.