विधानपरिषद सदस्य पदासाठी प्रा.यशपाल भिंगे यांचे नाव चर्चेत

नांदेड

नांदेड,बातमी24: लोकसभा निवडणुकीत पावणे दोन लाख मते घेणाऱ्या त्या वेळच्या वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार राहिलेल्या प्रा.यशपाल भिंगे यांचे नाव राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढे आले आहे.प्रा.यशपाल भिंगे हे धनगर समाजातील वैचारिक चेहरा व प्रभावी वक्ता म्हणून ओळखले जातात.

राज्यपाल नियुक्त बारा जागेवर निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.यासाठी शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी चार जागा वाट्याला येणार आहेत.यात राष्ट्रवादीकरून भाजपमधून नुकतेच प्रवेश केलेले एकनाथ खडसे,राजू शेट्टी,आनंद शिंदे व प्रा.यशपाल भिंगे यांची नावे पुढे आली आहे.

राष्ट्रवादीने दलित समाजातून आनंद शिंदे यांना,स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांना तर धनगर समाजातील विचारवंत तथा मराठी विषयांचे वरिष्ठ प्राध्यापक असलेले प्रा.यशपाल भिंगे यांच्या नावाचा सुद्धा विचार केला असल्याचे समजत. नांदेड लोकसभा निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार असताना प्रा.भिंगे यांनी जवळपास पावणेदोन लाख मते मिळविली होती. भाजपकडे जाणाऱ्या धनगर समाजास रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रा.भिंगे यांच्या माध्यमातून धनगर कार्ड पुढे आणल्याचे बोलले जात आहे. वंचितमधून भाजपमध्ये गेलेल्या गोपीचंद पडळकर यांना मागच्या वेळी भाजपने विधान परिषद आमदार केले,त्याचप्रमाणे राष्ट्रवादीने प्रा.भिंगे यांच्या माध्यमातून धनगर समाजातील वैचारिक चेहरा पुढे आणू शकते. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीच्या कोट्यातून प्रा.भिंगे यांचे नाव समोर आले आहे.