नांदेड-वाघाळा मनपा आयुक्त डॉ.लहाने यांची बदली ठरली औटघटकेची

नांदेड

नांदेड,बातमी24:-नांदेड-वाघाळा महानगरपालिका आयुक्त डॉ.सुनील लहाने यांची बदली काही तासांचीच ठरली. रात्रीतून निघालेले आदेश हे रात्रीतूनच रद्द झाले आहेत.तर नांदेड येथे आयुक्त म्हणून ज्यांचे आदेश निघाले होते,त्या तृप्ती सांडभोर या परभणी मनपा आयुक्त म्हणून जाणार असल्याचे नव्या आदेशाने समोर आले आहे.डॉ.लहाने व सांडभोर या दोघांच्या बदल्यांचे आदेश रात्रीतूनच औटघटकेचे ठरल्याचे बघायला मिळाले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत नांदेड मनपा आयुक्त म्हणून आलेल्या डॉ.सुनील लहाने यांनी उत्तम समनव्यातुन शहराचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले.यातून शहराच्या विकासाला गती मिळण्यात त्याचे रूपांतर झाले. अशा काळात डॉ.लहाने यांच्या परभणी मनपा आयुक्त म्हणून बदलीचे आदेश मंगळवारी दि 30 रोजी प्राप्त झाल्याने सर्वांना धक्का बसला होता.

डॉ.लहाने यांच्या जागी पनवेल येथील मनपा अतिरिक्त आयुक्त असलेल्या तृप्ती सांडभोर यांचे आदेश झाले. मात्र रात्रीतून चक्र काय फिरले,हे कळू शकले नाही; पण सकाळी लहाने यांच्या बदलीचे आदेश रद्द करण्यात आल्याचे पत्र शासनाकडून काढण्यात आले,तर डॉ.लहाने यांच्या जागी येणाऱ्या सांडभोर यांचे परभणी मनपा आयुक्त म्हणून नव्याने आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.