लॉकडाऊन नसले;तरी नियम कडक होणार

नांदेड

नांदेड, बातमी24ः-गत दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात लॉकडाऊन होणार याबाबत लोकांमध्ये जोरदार चर्चा होती. मात्र लॉकडाऊन केले जाणार नसून लोकांनी नियमांचे पालन करावे, मात्र नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊनसंबंधी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी देत लॉकडाऊनच्या चर्चांना विराम देण्याचा प्रयत्न केला.

कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात लॉकडाऊन केले जाणार अशी चर्चा होती. यासंबंधी पालकमंत्री अशोक चव्हाण जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याही या विषयाच्या अनुषंगाने चर्चा झाली होती. लॉकडाऊनच्या निर्णय व्यापार्‍यांशी विचारविनिमय करून घेतला जावा, असे अशोक चव्हाण यांनी सूचित केले होते. त्यानुसार मंगळवार दि. 7 जुलै रोजी व्यापार्‍यांशी संवाद साधला.

लॉकडाऊनबाबत व्यापार्‍यांनी विरोध दर्शविला. नियमांसंबंधी सूचना कडक केल्या जाव्यात, परंतु लॉकडाऊन केल्यास व्यापार व व्यवसायावर मोठा परिणाम होऊ शकते, असे व्यापार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशनास आणून दिले. कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत पोलिसांना कळविण्यात आले आहे. नियमांचा भंग करणार्‍यावर कारवाई केली जाणार आहे. नियमांबाबत परिस्थिती हाताबाहेर गेल्यास निर्णय घेण्यात येईल, मात्र तुर्ततरी लॉकडाऊन होणार नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे मागच्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना खुद जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी पूर्णविराम दिला आहे.