गाव तिथे स्मशान आणि दफनभूमी:-वर्षा ठाकूर यांनी माहिती

नांदेड

 

नांदेड,बातमी24 :- जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना आपल्या हक्काची स्मशान व दफनभूमी असावी यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या निर्देशाखाली महसूल व जिल्हा परिषद यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्नरत असून लवकरच प्रत्येक ग्रामपंचायत या भावनिक प्रश्नाची कोंडी दूर करुन ग्रामस्थांना दिलासा देईल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांनी दिला.

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना स्वत:ची स्मशान व दफनभूमी नसल्याने मोठ्या भावनिक आणि गुंतागुंतीच्या पेचाला सामोरे जावे लागत होते. शासनाने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन यातून मार्ग काढण्यासाठी गाव तेथे स्मशान व दफनभूमी ही मोहिम हाती घेतली. या मोहिमेची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा घुगे-ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी व तहसिलदार यांची संयुक्त आढावा बैठक झाली. या बैठकीत त्यांनी माहिती दिली.

प्रत्येक तालुक्यांच्या ठिकाणाहून तहसिलदार आणि गटविकास अधिकारी यांनी एकत्र येऊन आपआपल्या तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सद्यस्थिती दर्शक अहवालाची मांडणी करुन त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक अडचणीही निदर्शनास आणून दिल्या. ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा नाही अशा गावांसाठी ग्रामपंचायतकडे उपलब्ध गायरान व इतर जागेवर स्मशान व दफनभूमी उभी करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतीकडे गायरान व इतर कसलीही जमीन नाही अशा गावांमध्ये दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन जागा दिल्यास त्यांचा गौरव व सन्मान करुन त्या जमीनी स्विकारल्या जातील असेही शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या गावात दानशूर व्यक्ती पुढे आले नाही तर त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत खाजगी असलेल्या जमिनी विकत घेण्याचे प्रावधानही करण्यात आले आहे. यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे.