नांदेड,बातमी24- आ. बालाजी कल्याणकर हे कोरोनाग्रस्त झाले असून त्यांच्यावर सध्या गुरुगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण देत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच, त्यांनी संबंधित एजन्सीच्या
संचालकास बोलावून खडे बोल सुनावले आहेत. याबाबत आ. बालाजी कल्याणकर यांनी वैद्यकीय विभागाकडे तक्रार केली असून संबंधित एजन्सीचा करार रद्द करत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाव्हायरस ने हाहाकार माजवला आहे. कोरोना ची लागण मोठ्या प्रमाणात नागरिकांना होत आहे. नागरिक मिळेल त्या रुग्णालयात भरती होत आहेत. शासकीय रुग्णालयात देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत आहेत. शासकीय यंत्रणा देखील तितक्याच तत्परतेने रुग्णांवर उपचार करत आहे. दिवस-रात्र एक करून वैद्यकीय विभाग रुग्णांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत असताना निकृष्ट दर्जाचे अन्न मात्र एजन्सीकडून रुग्णांना दिल्या जात आहे. नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर हे मागील सात दिवसांपासून गुरुगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. अनेक रुग्णांनी आ. बालाजी कल्याणकर यांच्याकडे जेवणाबाबत तक्रारी केल्या होत्या. आ. बालाजी कल्याणकर यांनी स्वतः याची शहानिशा करून संबंधित एजन्सीच्या संचालकास बोलावून घेतले. सकाळी सात वाजता रुग्णांना द्यायचा नाष्टा एजन्सीकडून रुग्णांना दहा वाजता दिला जात आहे. तसेच जेवणाचा देखील वेळ पाळत नसल्याचे समोर आले आहे. जेवण हे एका कॅरीबॅगमध्ये देत असल्याची गंभीर बाब देखील समोर आली आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार आ. बालाजी कल्याणकर यांनी जिल्हाधिकारी विपीन इटणकर तसेच अधिष्ठाता निळकंठ भोसीकर यांच्या कानावर घातला आहे. याबाबत अधिष्ठाता नीळकंठ भोसीकर यांनी देखील या एजन्सीवर तात्काळ कारवाई केली असल्याचे आ. बालाजी कल्याणकर यांना सांगितले आहे.
Comments are closed.