आमदार कल्याणकर यांनी अधिकार्‍यांना घेतले फैलावर

राजकारण

नांदेड, बातमी24ः-याही वर्षी कोरोना, बोगस बियाणे, अतिवृष्टी या सह किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी पुरते अडचणीत आले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना बँकांनी तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना आ. बालाजी कल्याणकर यांनी लिंमगाव येथील तिन्ही बँकांना केल्या आहेत. शेतकर्‍यांना त्वरित कर्ज उपलब्ध करून द्या अन्यथा आपली गय केली जाणार नसल्याचे सांगतआ. बालाजी कल्याणकर यांनी अधिकार्‍यांना फै लावर घेतले.

शेतकर्‍यांना खरीप व रब्बी हंगामामध्ये पीक कर्ज उपलब्ध करून देण्याकरिता बँकांना दरवर्षी उद्दिष्टे ठरवून दिले जाते. त्यानंतर हंगामामध्ये शतप्रतिशत शेतकर्‍यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनासह प्रशासनाकडूनही बँकांना सूचना केल्या जातात. मात्र गेल्या दोन वर्षापासून बँकांनी आपली उद्दिष्टे पूर्ती केली नाही. बँकांनी शेतकर्‍यांना पीक कर्ज दिले नाही, त्यामुळे शेतकर्‍यांना अडचणी येत आहेत.

अस्मानी-सुलतानी संकटाशी सामना करीत शेतकरी दिवस-रात्र कष्ट करीत आहेत. पण त्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. त्यात यावर्षी कोरोणा, बोगस बियाणे शेवटी अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. अशा काळात बँकांनी शेतकर्‍यांना आधार देण्याची गरज आहे. लिंबगाव येथील भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक या तीनही बँकेत आ. बालाजी कल्याणकर यांनी जाऊन तेथील बँक व्यवस्थापक अमित भाग्यवंत, ग्रामीण बँकेचे कांबळे यांना सूचना केल्या आहेत. तसेच शेतकर्‍यांची बँकेकडून अडवणूक होता कामा नये, त्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले आहे.

या वेळी आ. बालाजी कल्याणकर यांच्या सोबत विजय कदम, वामनराव कदम, भीमराव कदम, तानाजी भालेराव, गोपाळराव कदम, साहेबराव कदम, रंगनाथराव कदम, दादाराव कदम यांच्यासह आदीजण उपस्थित होते.