राजकीय हस्तक्षेपाविना बदल्यांना सुरुवात;पहिल्यांदाच दबावमुक्त प्रक्रिया

नांदेड

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्‍हा परिषदे अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील कर्मचा-यांच्‍या सार्वत्रिक बदली प्रक्रिया समुपदेशनाव्‍दारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात बदली प्रक्रियेला आज पासून सुरुवात झाली आहे. या वर्षीच्या बदल्या ह्या प्रशासक म्हणून सीईओ वर्षा ठाकूर या राजकीय दबावमुक्त करत असून सर्वांना न्याय देण्याची भूमिका असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

बदली प्रक्रियेच्‍या पहिल्या दिवसी आज शुक्रवार दिनांक 20 मे रोजी विविध संवर्गातील 29 कर्मचा-यांच्‍या बदल्या करण्‍यात आल्‍या आहेत. यात बांधकाम विभागातील 16 बदल्‍या, ग्रामीण पाणी पुरवठा विभागात 2 तर महिला व बालकल्‍याण विभागातील 11 बदल्‍यांचा समावेश आहे.

बांधकाम विभागाच्या बदली प्रक्रियेत 16 बदल्यांचा समावेश आहे. यात शाखा अभियंता/ कनिष्‍ठ अभियंता पदाच्‍या 10 बदल्या आहेत. यात प्रशासकीय 4 तर विनंतीने 6 बदल्या झाल्या. स्‍थापत्‍य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या 5 बदल्या झाल्या यात प्रशासकीय 2 तर विनंतीच्या 3 बदल्या करण्यात आल्या. कनिष्‍ठ आरेखक पदाची एक प्रशासकीय कारणावरुन बदली करण्‍यात आली.

लघु पाटबंधारे विभागात एकही कर्मचारी बदली प्रात्र नसल्यामुळे या विभागाच्‍या बदल्या झाल्या नाहीत. ग्रामीण पाणी पुरवठा विभागात 2 बदल्‍या झाल्‍या. यात सहाय्यक अभियंता पदाची एक तर कनिष्ठ अभियंता पदाची एक विनंतीवरुन बदली करण्‍यात आली. महिला व बालकल्‍याण विभागातील 11 अंगणवाडी पर्यवेक्षीकांच्‍या बदल्‍या झाल्‍या. यात प्रशासकीय 3 तर विनंती वरुन 9 बदल्‍यांचा समावेश आहे.

बदली प्रक्रियेत यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे, महिला व बालकल्‍याण विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, सागर तायडे, अशोक भोजराज, ए.आर. चितळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. सविता बिरगे, शिक्षणाधिकारी माध्‍यमिक प्रशांत दिग्रसकर आदींची उपस्थिती होती.

शासन निर्णयाच्‍या निकषानुसार समुपदेशाने बदली प्रक्रिया पार पाडल्‍या जात आहेत. जिल्‍हयातील सर्व तालुक्‍यात असणा-या जागांच्‍या समानिकरणानुसार पारदर्शक बदल्‍या करण्‍यात येत आहेत. आज शनिवार दिनांक 21 मे रोजी कृषी विभागातील कर्मचा-यांच्‍या सकाळी 10 ते 12 या वेळेत तर सामान्य प्रशासन विभागाच्या बदल्या दुपारी 12 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत चालू राहणार आहे.