नांदेड

भंडारे व महाप्रसाद वाटप करणाऱ्यां आयोजकांना जिल्‍हाधिकाऱ्यांनी सूचना

नांदेड,बातमी 24 :- उद्या होणाऱ्या शिवरात्री निमित्त विविध ठिकाणी उद्या आयोजित होणाऱ्या भंडारामध्ये महाप्रसाद सेवन करणाऱ्यांनी व महाप्रसाद वाटप करणाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत विषबाधा होणार नाही, अन्न सेवन करणाऱ्यांना त्रास होणार नाही यासाठी व्यक्तिगतरीत्या काळजी घ्यावी तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नांदेड जिल्‍ह्यात गत काही दिवसात अन्‍न विषबाधेच्‍या घटना घडल्‍या आहेत. लोहा तालुक्‍यातील कोष्‍टवाडी येथे महाप्रसादामधून 7 फेब्रुवारी 2024 रोजी अन्‍न विषबाधेची मोठी घटना घडली होती. तसेच 6 मार्च 2024 रोजी मुदखेड, हदगाव व भोकर येथेही अशा प्रकारच्‍या घटना घडल्‍या आहेत. उद्या 8 मार्च 2024 रोजी जिल्‍ह्यात शिवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी होत असून, या दिवशी अनेक ठिकाणी उत्‍सव व यात्रांचे आयोजन करण्‍यात येते. अशावेळी उत्‍सव व यात्रांचे ठिकाणी मंदीर परिसरात भंडारे असतात व महाप्रसादाचे वाटप होते. सदरील भंडारे व महाप्रसादाचे अन्‍न पदार्थांमधून विषबाधा होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. अन्‍न विषबाधेच्‍या घटना टाळल्‍या जाव्यात यासाठी भंडारा व महाप्रसाद आयोजकांनी आवश्‍यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. या अनुषंगाने सर्व संबधित विभागांना आवश्‍यक त्‍या सूचना दिल्‍या आहेत.

मागील अनुभव पाहात भंडारे व महाप्रसाद तयार करण्‍यात आलेले अन्‍न हे मुख्‍यतः भगर तसेच शाबूदाना, राजगीरा, तेल, आलू, रताळी इ. या पदार्थांपासून बनविण्‍यात आल्‍याचे निदर्शनास आले आहे. तसेच कालही उपवासाला भगर या पदार्थाचा वापर केल्‍यामुळे बऱ्याच जणांना सौम्‍य ते तीव्र स्‍वरुपाची अन्‍न विषबाधा झाल्‍याचे निदर्शनास आले आहे. कोणालाही गंभीर विषबाधा झालेली नाही. आरोग्‍य विभागाच्‍या तत्‍परतेमुळे विषबाधा झालेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या स्थितीत औषधोपचाराने सुधारणा झालेली असून सध्‍या दवाखान्‍यात डॉक्‍टरांच्‍या निगराणीखाली आहेत. तसेच प्रशासनाकडूनही काही दुषित भगर साठ्यांबाबत कार्यवाही करण्‍यात येत आहे. त्‍यामूळे येणाऱ्या सण, उत्‍सव, यात्रा या निमित्‍ताने भंडारा व महाप्रसादासाठी तसेच घरगुती वापरासाठी भगर व तत्‍सम पदार्थांचा वापर टाळावा, जेणे करुन अन्‍न विषबाधा होणार नाही. तसेच जेवण केल्‍यानंतर उलटी, मळमळ, संडास इ. लक्षणे आढळल्‍यास घाबरुन न जाता तात्‍काळ नजीकच्‍या दवाखान्‍यास संपर्क साधावा व उपचार घ्‍यावेत.

दुषित झालेले अन्‍न पदार्थ खाल्‍ल्‍यानंतर साधारणपणे 8 ते 10 तासात (विषबाधेस कारणीभूत जिवाणूंच्‍या प्रकारानुसार ) पोट दुखणे, थंडीवाजून ताप येणे, डोके दुखणे, उलटी, जुलाब वगैरे लक्षणे हळूहळू दिसू लागतात. विषद्रव्‍यांमूळे होणारी विषबाधा तीव्र व काही वेळा अतितीव्र असते. मळमळ, पोटात गुबारा, चक्‍कर येणे, पोटदुखी, उलटी जुलाब अशी लक्षणे 2 ते 4 तासात दिसू लागतात. शरीराचे तापमान कमी होते. बंद डब्‍यातील विषद्रव्‍यामुळे दुषित झालेले अन्‍न पदार्थ खाल्‍यानंतर 1 ते 24 तासात डोके दुखणे, उलटी जुलाब ही लक्षणे आढळतात अशी माहिती जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी दिली.

अन्‍न दुषित होण्‍यास सर्व साधारणपणे अस्‍वच्‍छता, अन्‍न पदार्थ अर्धवट शिजवणे, अन्‍न शिजवून बराच काळ ठेवून नंतर उपयोगात आणणे, अन्‍नपदार्थ शिजविण्‍यासाठी, वाढण्‍यासाठी वापरण्‍यात येणाऱ्या भांड्यांना कल्‍हई नसणे, भांडी अस्‍वच्‍छ असणे, अन्‍न शिजविण्यासाठी वापरण्‍यात येणाऱ्या दुषित पाण्‍यामुळे तसेच वैयक्तिक आरोग्‍याच्‍या बाबतीत उदा. सर्दी पडसे झालेल्‍या, हातावर फोड असलेल्‍या व्‍यक्‍तींनी अन्‍न पदार्थ हाताळल्‍यास अन्‍न दुषित होते. योग्‍य ती दक्षता भंडारे व महाप्रसाद वाटप करणाऱ्या आयोजकांनी घ्‍यावी, तसेच अन्‍न विषबाधेशी सबंधीत लक्षणे दिसून आल्‍यास वेळ वाया न घालवता तात्‍काळ नजिकच्‍या प्राथमिक आरोग्‍य केंद्रास व ग्रामीण रुग्‍णालयास याबाबत तात्‍काळ कळवावे व उपचार घ्‍यावेत, असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले आहे.

 

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago