भोसी पॅटर्न ग्रामीण भागास कोरोनामुक्तीसाठी फलदायी:-सीईओ ठाकूर

ताज्या बातम्या नांदेड

नांदेड,बातमी24:- कोरोनामुक्‍तीसाठी भोकर तालुक्‍यातील भोसी गावाने राबविलेल्‍या पॅटर्नमधून 119 कोरोना बाधित रुग्‍ण पंधरा दिवसानंतर कोरोनामुक्‍त झाले आहेत. हा पॅर्टन जिल्‍हयात राबविण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.

काल बुधवार दिनांक 12 मे रोजी भोकर तालुक्‍यातील भोसी प्राथमिक आरोग्‍य केंद्रातंर्गत सर्व आरोग्‍य कर्मचारी, आशा वर्कर, परिचारिका, अंगणवाडी कार्यकर्ती, वैद्यकिय अधिकारी यांची बैठक घेऊन ऑनलाईन संवाद साधला. त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. या बैठकिस जिल्‍हा परिषद सदस्‍य प्रकाश देशमुख भोसीकर, जिल्‍हा आरोग्‍य आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. राहूल वाघमारे, वैद्यकिय अधिकारी डॉ. यू.एम. डोंगरे आदींची उपस्थिती होती.

दोन महिन्‍यापूर्वी एका लग्‍न सोहळयानंतर भोसी येथे एकजण कोरोना बाधीत आढळले, त्‍यानंतर पाच जण बाधित आढळले. यावेळी जिल्‍हा परिषद सदस्‍य प्रकाश भोसीकर यांनी आरोग्‍य विभागाच्‍या अधिका-यांची बैठक घेवून ग्रामस्‍थाचे समुपदेशन केले. त्‍यानंतर गावात कोरोना चाचणी करण्‍यात करण्‍यात आली. त्‍यावेळी तब्‍बल 119 जण बाधित आढळून आले. बाधितांना लगेच त्‍यांच्‍या शेतातच राहण्‍याची सोय करण्‍यात आली. ज्‍यांच्‍याकडे शेती नाही त्‍यांची सोय प्रकाश भोसीकर यांच्‍या शेतात शेडमध्‍ये करण्‍यात आली. आरोग्‍य सेविका, आशाताई, अंगणवाडी कार्यकर्ती यांनी दररोज शेतात जाऊन बांधितांशी संवाद साधून त्‍याच ठिकणी औषधी व जेवण पुरविण्‍याता आले. या उपक्रमामुळे पंधरा दिवसात 119 कोरोना बाधित कोरोनामुक्‍त झाले. बाधित व्‍यक्‍ती गाव सोडून शेतात राहिल्‍यामुळे गावात कोरोना पसरु शकला नाही.

या उपक्रमाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सर्व आरोग्‍य अधिकारी, कर्मचारी, आशावर्कर, अंगणवाडी कार्यकती आदींचे अभिनंदन केले. भोसी येथे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी समन्‍वय ठेवून जसा पॅटर्न राबविला तसाच पॅर्टन जिल्‍हयात राबविण्‍यात यावा असे निर्देश त्‍यांनी यावेळी दिले.

यावेळी आरोग्‍य कर्मचा-यांनी गावात राबविण्‍यात आलेल्‍या उपक्रामाची माहिती सिईओंना दिली. जिल्‍हा परिषद सदस्‍य प्रकाश भोसीकर म्‍हणाले, कोरोना विषयी भिती बाळगण्‍याची गरज नाही. कोरोना झालेल्‍या व्‍यक्‍तींनी आपल्‍या गावापासून दूर राहिल्‍यास गावात कोरोनाचा प्रसार होणार नाही. भोसी येथे सर्व बाधित नागरिकांना शेतात विलगीकरणात ठेवल्‍यामुळे आम्‍ही कोरोनाला भोसीमध्‍ये रोखू शकलो. या उपक्रमामुळे दोन महिन्‍यापासून गावात रुग्‍ण आढळलेला नाही. कोरोनामुक्‍तीसाठी जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी सूक्ष्‍म नियोजन केले होते.