नांदेड, विशेष प्रतिनिधी
ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण कोर्टाने फेटाळल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबणीवर पडल्याने 32 वर्षानंतर जिल्हा परिषदेवर प्रशासन आले आहे.सोमवार दि.21 रोजी सीईओ वर्षा ठाकूर यांनी जिल्हा परिषद प्रमुख म्हणून सत्तेची सूत्रे हाती घेतली. ग्रामीण भागाला न्याय कसा देता येईल ही माझी पूर्वीपासून भूमिका असते, यापुढे ही अधिकारी-कर्मचारी यांना सोबत घेऊन काम करू अशी ग्वाही सीईओ ठाकूर यांनी दिली.
मागच्या पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात झाल्या होत्या.तर जिल्हा परिषद अध्यक्ष निवड ही 21 मार्च 2017 रोजी झाली होती.मात्र यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षण कोर्टाने स्थगित केल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी जोपर्यंत ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय होत नाही,तोपर्यंत निवडणूका लांबणीवर टाकल्या जाव्यात अशी भूमिका घेत,तसा ठराव विधिमंडलाच्या अधिवेशनात घेतला.त्यामुळे जिल्हा परिषद असो,अथवा मनपा व नगर पालिका यावर प्रशासन येणार हे जाहीर झाले होते.
त्यानुसार जिल्हा परिषदमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा अध्यक्ष निवडीच्या तारखेनुसार संपतो.तो आज रोजी संपला आहे.त्यामुळे सीईओ या सर्व विभागाच्या प्रमुख म्हणून कारभार हाती घेतला.
नांदेड जिल्हा परिषदेवर तब्बल 32 वर्षानंतर प्रशासक आले आहे. यापूर्वी 01 जुलै 1990 साली. त्यावेळचे सीईओ डॉ. विजय सतंबीरसिंघ यांनी दोन वर्षे प्रशासक म्हणून कामकाज पाहिले.त्या दोन वर्षांच्या काळात निवडणुका झाल्या नव्हत्या.त्यानंतर कै. गंगाधर कुटूंरकर हे अध्यक्ष झाले होते. 14 अध्यक्षानंतर सीईओ म्हणून वर्षा ठाकूर यांना प्रशासक म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
प्रशासकीय पातळीवर उत्तमरित्या जिल्हा परिषदेच्या कारभाराची जाणीव असलेल्या वर्षा ठाकूर यांच्याकडून सुधारणा तसेच विकासाची कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा सर्वत्र असून पुढील काळात सर्व निर्णय ताकदीनिशी व धडाकेबाज प्रशासन बघायला मिळू शकते.