जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24:- वादळी वादावादीमुळे पाच दिवसांपूर्वी तहकूब करावी लागलेली जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा बुधवार दि.23 जून रोजी घेण्यात आली.सदरची सभा वादळी ठरेल असे वाटत होते.मात्र काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना व काही भाजप सदस्यांवर कांडीचा परिणाम झाल्याचे दिसून आले. काही किरकोळ अपवाद वगळता आजची झालेली सभा समशान शांततेत पार पडली.
यापूर्वी 16 जून रोजी सर्वसाधारण सभा झाली. मात्र त्यावेळी उकाडा आणि पदाधिकारी व सदस्य असा वाद टोकाला गेल्यामुळे सभा तहकुब करावी लागली होती.आज झालेल्या सभेत सबकुछ अलबेल असल्याचे बघायला मिळाले.बोटावर मोजक्या येईल सदस्यांचा अपवाद वगळता सर्व सदस्य गप्पगार होते. विभागवार आढावा घेतला का घेतला असेच चित्र बघायला मिळाले.सरते शेवटी तर बऱ्याच विभागाचा आढावा न घेता सभा संपल्याचे सदस्यांनीच जाहीर केले.यात विशेष नोंद करावी अशी बाब सांगण्यासारखी ठरली,ती म्हणजे,मागच्या सभेत अध्यक्ष मंगाराणी अबुलगेकर यांच्याविरुद्ध रान उठविणारेच सदस्यांनी आर्थिक नियोजनाचे अधिकारी देत असल्याचा एकमुखी ठराव घेतला.
सभेच्या सुरुवातीला चंद्रसेन पाटील यांनी माळेगाव यात्रा मानकरी यांचे मानधन न दिल्याचा मुद्दा रेटून धरला.यावर अध्यक्ष मंगाराणी अबुलगेकर यांच्या यावरून खडाजंगी झाली. प्रशासन ही या विषयावर बॅकफूटवर आले होते.मागचे व पुढील यात्रेचे मानधन एकत्र देता येईल असे आश्वासन सौ. अबुलगेकर यांनी दिल्यानंतर या विषयावर पडदा पडला.घरकुल योजनेतील दिरंगाईवर समाधान जाधव, प्रकाश भोसीकर, दशरथ लोहबदे,लोखंडे यांनी आवाज उठविला.ज्यांनी कामेच सुरू केली,अशी लाभार्थ्यांकडून वसुली सुरू करा,मात्र नव्याने मंजुरी मिळालेल्या लाभार्थी यांना त्रास देऊ नये,असे कळविण्यात आले.यावेळी घरकुल योजनेस साडे तीन लाख रुपये सरकारने द्यावे,असा ठराव घेण्यात आला,तसे शासनाला कळवावे,असे सदस्यांनी सूचित केले.यावर बोलताना सीईओ वर्षा ठाकूर यांनी घरकुल योजना गतिमान करण्यावर विशेष लक्ष दिले जात असून बीडीओ यांना तशी ताकीद दिल्याचे त्यांनी सांगितले.अशा कामात कुणी अधिकारी-कर्मचारी पैसे मागत असतील तर एसीबीकडे तक्रार करावी, असे सदस्यांना स्पष्टपणे सांगितले.
शिक्षण विभागाच्या आढाव्यात माळेगाव येथील शिक्षकाने केलेल्या अपहाराचा मुद्दा चंद्रसेन पाटील यांनी लावून धरला.त्या दोषी शिक्षकास निलंबित केल्याचे शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांनी सांगितले.धर्माबाद पंचायत समिती सभापती कागेरू यांनी पंचायत समितीच्या गाडी नसल्यावरून बरीच आदळआपट केली,मोठा आवाजात न बोलता नियमाप्रमाणे बोला असे खडेबोल सौ.अबुलगेकर यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात आरोग्य विभागाने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांचा अभिनंदन ठराव मनोहर शिंदे यांनी मांडला.यास साहेबराव धनगे यांनी अनुमोदन दिले.
पाणी पुरवठा प्रभारी कार्यकारी अभियंता बारगळ यांची मात्र यावेळी चंद्रसेन पाटील यांनी झाडाझडती घेतली.बारगळ यांच्या संदर्भात गंभीर प्रकरणे चंद्रसेन पाटील यांनी सभागृहाच्या निर्देशनास आणून दिली. मनोहर शिंदे यांनी सुद्धा बारगळ यांची कानउघडणी केली. प्रत्येक सभेत धारेवर धरण्यात पटाईत असणारे सदस्य यावेळी मुगगिळून गप्प होते.जिल्ह्याच्या राजकारणातील हुकूमत असलेल्या बड्या नेत्याने सदस्यांना गप्प राहा,सभा चालवू द्या अशी ताकीद दिल्याने सदस्य सभेत गप्प बसून सभा संपण्याची वाट बघत होते.यावेळी अनेक सदस्य सुद्धा सभेला गैरहजर राहिल्याने जादूची कांडी प्रभावशाली ठरल्याचे शिकमोर्तब झाले.