बारगळचा बाष्कळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर; सरपंचाने केली संचिकेची होळी

नांदेड

नांदेड,बातमी24:-ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता म्हणून शेकडो करनाम्याचा कळस रचणाऱ्या बारगळ यांच्या बाष्कळ कारभाराचे पितळ एका सरपंचाने जनतेसमोर आणले आहे. तीन महिन्यापूर्वी सादर केलेल्या नांदेड जिल्ह्यातील पाणी टंचाई आराखड्यांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱयांच्या बेजबाबदार पणामुळे पावसाळा लागला तरी कार्यारंभ आदेश पारित केले नाही. संतापलेल्या किनवट तालुक्यातील घोटी ग्रा प चे सरपंच बालाजी पावडे यांनी या निषेधार्थ आज जिल्हा परिषदेच्या आवारात टंचाई आराखड्याची होळी करून निषेध
नोंदविला.

जिल्ह्यात उन्हाळ्यातील पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दरवर्षीच पाणी टंचाई आराखडा तयार करून मंजुरी देण्यात येते त्यानुसार यावर्षी उन्हाळयापूर्वी नांदेड जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावातील सरपंचांनी आपल्या आपल्या गावातील परिपूर्ण पाणीटंचाई आराखडे जि प च्या पाणी पुरवठा विभागाकडे सादर केले या आराखड्याना प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळाली, परंतु तीन महिने लोटले तरी आणि पावसाळा सुरू होऊन महिना लोटला तरी पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता बारगळ व व पाणीपुरवठा लेखाधिकारी सुनील केंद्रे यांच्या हलगर्जीपणामुळे अद्यापही नांदेड जिल्ह्यातल्या मंजूर पाणी टंचाई आराखडयांचे कार्यारंभ आदेश पारित झाले नाही. परिणामी नांदेड जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे दरम्यान पाणीपुरवठा विभागाच्या या बेजबाबदार धोरणाचा संताप व्यक्त करत किनवट तालुक्यातील घोटी ग्रामपंचायतचे सरपंच बालाजी पावडे यांनी आज जिल्हा परिषदेच्या आवारात पाणीटंचाई आराखड्याची होळी करून अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांचा बेजबाबदार धोरणाचा निषेध व्यक्त केला, असून मंजूर पाणीटंचाई आराखड्याचे कार्यारंभ आदेश पारित करायचे नव्हते तर उन्हाळ्यापूर्वी स्थानिक पातळीवर टंचाई निवारणार्थ वारंवार बैठका लावून आराखडे का तयार करून घेतले असा सवाल उपस्थित करत टँकर धारकांना तसेच खाजगी विहीर धारकांना अधिग्रहनाच्या माध्यमातून आर्थिक फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी कार्यारंभादेश रोखून शासनासह टंचाईग्रस्त गावातील नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप सरपंच बालाजी पावडे यांनी केला आहे