सीईओ वर्षा ठाकूर यांची वाढली डोकेदुखी!

नांदेड

नांदेड, बातमी24:-नांदेड जिल्हा परिषद सीईओ वर्षा ठाकूर यांच्या कामकाज कार्यपद्धती ही गतिमान राहिली आहे.मात्र मागच्या काही दिवसांमध्ये विभाग प्रमुखांची रिक्त पदे गतिमान कारभाराला मारक ठरत असल्याने सीईओ वर्षा ठाकूर यांना कामकाज चालवित असताना डोकेदुखी ठरत आहे. मात्र अशा परिस्थितीत आहे त्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्या कारभार चालवावा लागत आहे.

नांदेड जिल्हा परिषदमध्ये तब्बल आठरा विभाग प्रमुख आहेत.त्यापैकी पूर्ण वेळ हे नऊच अधिकारी आहे.गत महिन्याच्या शेवटी काही अधिकारी सेवानिवृत्त झाले तर महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील शिंगणे यांची अमरावती येथे पदोन्नतीने बदली झाली आहे.

आजघडीला ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पद हे दीड वर्षापासून रिक्त आहे, अद्याप शासनाने हे पद भरलेले नाही.ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पद सुद्धा आठ महिन्यांपासून रिक्त आहे. मागच्या महिन्याच्या शेवटी पाणी पुरवठा व स्वछता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इंगोले हे सेवानिवृत्त झाले आहेत. माध्यमिक विभागाला सुद्धा शिक्षणाधिकारी मिळालेले नाहीत. जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता हे पद रिक्त आहे.दक्षिण बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता हे पद रिक्त आहे.समाजकल्याण तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभाग असे नऊ पदे रिक्त असून या पदाचा पदभार प्रभारी अधिकारी मार्फत चालविला जात आहे.
ज्या प्रमाणे विभाग प्रमुखांची नऊ पदे रिक्त आहेत, तसेच उमरी,कंधार,हिमायतनगर,मुदखेड व नांदेड येथील गट विकास अधिकारी यांचे पद रिक्त असल्याने अतिरिक्त पदभार देऊन कामकाज चालवावे लागत आहे.

सीईओ म्हणून तातडीने निर्णय घेऊन लोकांचे कामे मार्गी लावावी,याकडे वर्षा ठाकूर यांच्या कटाक्ष असतो,मात्र प्रभारी अधिकारी यांच्याकडून गतिमान कारभार चालविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे,अशी परिस्थिती आहे. या संदर्भाने बोलताना सौ. ठाकूर म्हणाल्या,की रिक्त पदे ही प्रशासन चालवित असताना डोकेदुखी असली,तरी त्यावर मात करून कामकाज चालविणे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.