पहिली ते आठवीचे वर्ग 30 जानेवारी पर्यंत बंद;जिल्हाधिऱ्यांचे आदेश

नांदेड

नांदेड,बातमी24 :- नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्व विभागांचा आढावा घेऊन शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग 30 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत. तथापि विद्यार्थी जर घरीच बसून ऑनलाईन माध्यमाद्वारे शिक्षण घेत असेल तर त्याला व्यत्यय असणार नाही. इयत्ता 9 वी ते 12 वी वर्ग कोरोना विषयक नियमांचे पालन करुन प्रत्यक्ष सुरू राहतील. कोविड-19 विषयक सर्व नियमांचे व मार्गदर्शक सूचनांचे पालन शाळा व्यवस्थापनाने करणे बंधनकारक आहे. एखादा रुग्ण जर आढळून आला तर शाळा तात्काळ बंद करुन आवश्यक त्या उपाय योजना करण्याचे ही निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत. शिक्षकांनी कोविड काळात शाळेत उपस्थित राहून ऑनलाईन शिक्षण विषयक कामकाज व कोविड प्रतिबंधक विषयक जिल्हा प्रशासनाने दिलेली सर्व जबाबदारी पार पाडावी असे या आदेशात स्पष्ट केले आहे. सदर आदेश दि. 10 ते 30 जानेवारी, 2022 पर्यंत नांदेड जिल्हा क्षेत्रात लागू राहतील.
00000