काँग्रेसमधील बंड थंड;क्षीरसागर-कदम यांच्या पाठींबा

नांदेड

नांदेड,बातमी24:- देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून काँग्रेस नेते भीमराव क्षीरसागर व मंगेश कदम यांनी निवडणूक मैदानात उतरण्यासाठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता.मात्र काँग्रेस पक्षाकडून स्व. रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर जितेश अंतापुरकर यांना उमेदवारी जाहीर झाली. क्षीरसागर व कदम या काँग्रेस नेत्यांनी जितेश अंतापूरकर यांना पाठींबा दिला. या संबंधीचे कदम,क्षीरसागर व जितेश अंतापूरकर यांचे छायाचित्र सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या समवेत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काँग्रेस पक्षाकडून या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी,यासाठी मंगेश कदम व भीमराव क्षीरसागर हे स्वतंत्रपणे स्वतःचा प्रचार करत होते. भीमराव क्षीरसागर यांनी या मतदारसंघातील मतदारांना विकासाचे गुलाबी स्वप्न दाखविले. हायटेक प्रचार यंत्रणा राबविण्याचा प्रयत्न क्षीरसागर यांनी केला. तर कदम यांनी गावोगावी जाऊन मोर्चेबांधणी करण्याचा प्रयत्न केला.मात्र जितेश अंतापूरकर यांच्या उमेदवारीमुळे कदम व क्षीरसागर या दोघांचा पत्ता कट झालं.

अशोक चव्हाण यांनी कदम व क्षीरसागर या दोघांशी स्वतंत्र चर्चा करत मनधरणी केली. या भेटीनंतर कदम व क्षीरसागर यांनी जितेश अंतापूरकर यांना विजय करण्यासाठी जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे कदम व क्षीरसागर यांच्यामुळे बंडखोरी निर्माण झाली असती तर कदाचित कॉग्रेससाठी डोकेदुखी वाढली असती.