जिल्हाधिकारी डॉ.इटनकर चिरंजिवासह लिंबोटी धरणावर रमले

नांदेड

लोहा, बातमी24:-जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी रविवार दि. 30 ऑगस्ट रोजी लिंबोटी धरणावरील मत्स्य शेतीची पाहणी केली. या वेळी ते त्यांचे चिरंजीव आर्यनसोबत लिंबोटी धरणावर बराच वेळ घालविला.शिवाय मुलासोबत बोटींग करण्याचा आनंद ही घेतला. कोरोनामुळे व्यस्त राहिलेल्या डॉ. इटनकर हे चिमुकल्यासोबत बराच वेळ विरंगुळयात रमल्याचे बघायला मिळाले.

येथील जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मराठवाड्यातील सर्वात मोठा पिंजरा पद्धतीचा मत्स्यसंवर्धन प्रकल्प उभारलेला आहे. या प्रकल्पाला भेट देण्यासाठी डॉ.इटनकर हे मुलासोबत आले होते. यावेळी त्यांनी सदर प्रकल्पाचे कौतुक करत असे प्रकल्प जिल्ह्यात उभे राहिले पाहिजे,अशी अपेक्षा व्यक्त करत यासाठी सर्वोत्तपरि मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी त्यांच्या समवेत आमदार शामसुंदर शिंदे , महापालिका आयुक्त सुनील लहाने , जि प सदस्य चंद्रसेन पाटील,तहसीलदार श्री विठ्ठल परळीकर, मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त श्री. बादावार ,मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी सुरज कोल्हे, मत्स्यव्यवसाय कार्यालय अधीक्षक चंद्रमणी सोनटक्के यांच्यासह अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकार्‍यांसह त्यांचे चिरंजीव आर्यन व इतर सर्व अधिकार्‍यांनी लिंबोटी धरणात बोटिंगचा आनंद घेतला , शिवाय यावेळी आमदार शामसुंदर शिंदे यांनी माळेगाव तीर्थक्षेत्र विकास कामास गती देणे, लिंबोटी येथील रस्ता व परिसरातील इतर गावांच्या विकास कामांच्या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली.