कोवीड लसीकरणाला जिल्ह्यात प्रतिसाद; जिल्हाधिकारी डॉ.इटनकर गावोगावी

नांदेड

नांदेड,बातमी24;कोवीड-19 च्या आजारासाठी लसीकरण अंमलबजावणी जिल्ह्यात व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने 75 तासाची ही कोवीड लसीकरण मोहीम 21 ऑक्टोबर पासून जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. काल मध्यरात्रीपर्यंत 30 हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले. यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचे आरोग्य कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी पुढाकार घेतला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य यंत्रणा लसीकरणाच्या मोहिमेत सक्रिय झाली आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र याबरोबरच नागरी भागात ही लसीकरणाची मोहीम व्यापक स्वरूपात राबवली जात आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा, महाविद्यालय, महानगरपालिका, नगरपंचायत, सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे, यात्रेचे ठिकाण, चित्रपट गृह नाट्यगृह, आठवडी बाजार, मुख्य बाजार, तालुकास्तरावर मार्केट कमिटी आदी ठिकाणी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. दरम्यान पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी वीपीन इटनकर यांनी किनवट तालुक्यात दौरा केला. यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र बोधडी, उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा आदी ठिकाणी भेट देऊन रुग्णांशी संवाद साधून लसीकरण मोहीमेची माहिती घेतली. लसीकरणाच्या व्यापक मोहिमेसाठी यावेळी त्यांनी धर्मगुरुंची बैठक घेतली. हिमायतनगर तालुक्यातील बळीरामपुर तांडा येथे रात्री पर्यंत 92 टक्के लसीकरणाचे काम पूर्ण झाले. या केंद्रावर रात्री साडेदहा वाजता जिल्हाधिकारी वीपीन इटनकर यांच्या उपस्थितीत डोस देण्यात आला.
येत्या 25 ऑक्‍टोबरपर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत चालणार आहे. तरी नागरिकांनी कोवीडची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. वीपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.