मित्रानो !आपल्या मातृभाषेत एक म्हण आहे जावे त्यांच्या वंशा तेव्हाच कळे त्या प्रमाणे मी या जीवघेण्या संकटावर मात करून परत आलो आहे. एव्हाना मृत्यू जवळ दिसत असेल तर माणसांची स्थिती काय होते, हे ही काही प्रमाणात अनुभवले आहे .पण आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर मृत्यूलाही तेवढ्याच ताकदीने लाथाडता येते ,हे ही तेवढेच खरे आहे.
कोरोना अंगात घेऊन काही दिवस जगलोय, त्या मानसिक यातना भोगलोय. ती वेळ तुमच्यावर येऊ नये ,आलीच तर त्यातून तुम्हालाही या महामारीला परतवून लावता येते,यासाठी माझा अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. नांदेडचे विद्यमान पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू असलेले माजी सभापती ( नाव जाणीवपूर्वक टाळतो ) त्यांचा मला फोन आला. डॉक्टर माझी तब्येत ठीक नाही ,थोडे घरी येऊन जा. त्यांचे आणि माझे तब्बल 25 वर्षांचे संबंध असल्यामुळे मी लगेच त्यांच्या घरी पोहोचलो .पाहतो तर संपूर्ण कुटूंब फ्लू सदृश आजाराने त्रस्त दिसले.मी क्षणाचाही विलंब न करता त्यांना कोविडची टेस्ट करण्याची विनंतीवजा सूचना केली. त्यांना मेडिसिन लिहून दिले आणि विचारतच घरी आलो.
त्याच दिवशी मी माजी सभापती हे कोरोनाने त्रस्त असल्याची माहिती विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना दिली.दरम्यान माजी सभापती महोदय उपचारासाठी खाजगी कोविड सेन्टरमध्ये दाखल झाले आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले तरीपण त्यांची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिकच खालावली आणि त्यातच त्यांना मृत्यूने कवटाळले, ते ही कोरोनाने. जळवचा माणूस गेल्याने मला डॉक्टर असूनही प्रचंड धक्का बसला. मलाही घाबरल्या सारखे वाटले माझ्याही मनात कोविड विषयी शंकेची पाल चुकचुकली.
वास्तविक मी या काळात ज्यांना आरोग्य विषयक सल्ला देण्यासाठी ज्यांच्या कडे जात होतो. त्यावेळी तोंडाला मास्क , हाताला ग्लोव्हज आणि सॅनिटायजर सातत्याने वापरत होतो तरीही काळजी वाढली होती.
तपासणी केली ,सर्व नॉर्मल होते. पण मी स्टेबल नव्हतो. त्यांच्या सल्ल्यानुसार खासदार महोदयाचे स्वीय सहाय्यक समवेत शासकीय गाठले तपासणी केली असता मी कोरोना पोझिटिव्ह निघालो.
छातीत धड केले, थोडे अस्वस्थ वाटले.तसे वाटणे साहजिकच होते.डोळ्या समोर मुलगा आणि पत्नीचे आयुष्य उभे राहिले. मी पोझिटिव्ह असल्याची माहिती खासदार चिखलीकर साहेब त्यांचे दोन्ही स्वीय सहाय्यक वाघ सर,जाधव सर आणि सुरेशदादा गायकवाड ह्यांना मोबाईलवरून दिली आणि ते सर्वजण काही क्षणासाठी अवाक झाले.
पहिली रात्र अत्यंत भीतीदायक गेली. खूप वाईट विचार मनात येऊ लागले, डोळ्यासमोर अंधार येत होती.नको त्या विचाराचे वादळ डोक्यात सुरू होते. ती रात्र एका तपासारखी वाटली.सकाळ झाली, मी कोरोनाबाधित झाल्याची माहिती अन्य काही मित्र आणि नातेवाईकांना समजली. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार घरीच उपचार सुरू ठेवला. जेष्ठ सहकारी डॉक्टर पुंडे सर , डॉक्टर उबेद सर , डॉक्टर भुरके सर यांनी माझ्या प्रकृतीचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास करून उपचारात थोडा बदल केला. डॉक्टर शिरसिकर , डॉक्टर राम मुसांडे , डॉक्टर व्यंकटेश दुबे, डॉक्टर देवसरकर सर , डॉक्टर जाधव सर यांच्याकडून योग्य तो सल्ला मिळाला आणि माझ्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. पाच दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर काही चाचण्या केल्या त्या निगेटिव्ह आल्या त्यामुळे माझी इच्छाशक्ती अधिकच प्रबळ झाली.
डॉ व्ही एल परातवाघ
माजी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग)
नांदेड. 982229584