नांदेड,बातमी24:-काँग्रेसमधून पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी पुन्हा स्वतःसाठी काँग्रेसचे दरवाजे उघडे करून घेतले.त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे गणित बिघडणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात व देशात भाजपची सत्ता आल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीमधील अनेक दिगजांनी भाजपची वाट चोखळली.त्यात भाजपमध्ये पहिली उडी मारण्यात भास्करराव पाटील खतगावकर यांचा समावेश होता. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे दाजी असलेल्या खतगावकर यांचा भाजप प्रवेशाला त्यावेळी अन्यसाधारण महत्व आले होते.त्यांच्या नेतृत्व विश्वास ठेवून माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह काही माजी आमदार व विविध पदे भूषविलेले मंडळी ही सुद्धा भाजपात आली.
त्या दरम्यानच्या काळात शिवसेनेच्या तिकिटावर आमदारकीचा लोहा-कंधार मतदार संघातून निवडून आलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांचा भाजप प्रवेश आणि जिल्ह्यापुरती पक्षाची सर्व सूत्र खासदार चिखलीकर यांच्या ताब्यात गेल्यामुळे खतगावकर हे प्रचंड अस्वस्थ होते.यावरून त्यांनी अनेक केला पत्रकबाजी करून चिखलीकर यांना पक्षातर्गत शह देण्याचा प्रयत्न केला.मात्र पक्ष पातळीवरून चिखलीकर यांचे स्थान हळू शकले नाही.त्यामुळे खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या.निमित्त झाले ते आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर होत असलेल्या पोट निवडणुकीचे होय.
भाजपचे आयते उमेदवार असलेल्या सुभाष साबणे यांच्याबाबत मोठी नाराजी असल्याने खतगावकर यांनी ही संधी साधत बंडाचे निशान फडकावले. खतगावकर हे काँग्रेसमध्ये आल्यानंतर जितेश अंतापूरकर यांचा विजय निश्चित होईल अशी अटकळ साधत काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु झाली.रविवार दि.17 रोजी खतगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप राजीनामा देत असल्याचे जाहीर करत,यावेळी त्यांनी चिखलीकर यांच्या एकाधिकारशाहिला कंटाळून राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले.लवकरच ते देगलूर विधानसभा पोट निवडणूकीच्या निमित्ताने एका जाहीर सभेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले.