सामूहिक राष्ट्रगाणातून नवा विक्रम करण्याचा संकल्प

नांदेड

नांदेड,बातमी. 24:- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येत्या 11 जानेवारी रोजी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात सकाळी 11 वाजून 11 मिनीटांनी आयोजित केलेल्या ऐतिहासिक राष्ट्रगानासाठी आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, मनपा आयुक्त सुनील लहाने, जिल्हा प्रशासनाचे सर्व कार्यालय प्रमुख, तालुका पातळीवरील सर्व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.

नांदेड जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थाचे विद्यार्थी, नागरिक हे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला अभिवादन करण्यासाठी या राष्ट्रगीत व देशभक्ती गगीत असलेल्या राष्ट्रगान कार्यक्रमात मोठया संख्येने उर्त्स्फुत सहभाग घेतील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. हा उपक्रम केवळ शासकीय आहे असे नव्हे तर यात अधिकाधिक स्थानिक नागरिक यांच्या लोकसहभागाला विशेष आमंत्रित म्हणून सहभागी केले जात आहे. सर्व विभाग प्रमूख आपआपल्या कार्यालयाशी संबंधित व्यक्तीचा यात सन्मानाने सहभाग घेतील तसे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी विभाग प्रमुखांना दिले.
अत्यंत आगळा व वैशिष्टपूर्ण असलेला हा उपक्रम म्हणून याकडे पाहिले जाईल असे ते म्हणाले.

*मुख्य समारंभ पोलीस कवायत मैदानावर*

दिनांक 11 जानेवारी रोजी 11.11 मिनिटाला राष्ट्रगानाचा मुख्य कार्यक्रम नांदेड येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित केला आहे. या समारंभास विशेष निमंत्रित व उर्त्स्फुत सहभाग घेणारे नागरिक, निमंत्रित शालेय विद्यार्थी उपस्थित असतील. याबरोबर पोलीस दलातील परेड पथक, स्काऊट, एनसीसी व नेहरु युवा केंद्राशी संबंधित युवकाचा समावेश राहील.

*शासनाच्या प्रत्येक कार्यालयासमोर होईल राष्ट्रगान*
नांदेड येथील प्रत्येक विभागाच्या जिल्हा कार्यालयासह वाडी, वस्ती, तांड्यावरील ग्रामपंचायतीपर्यंत सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी आपल्या कार्यालयासमोर उभे राहून 11 जानेवारी रोजी दिलेल्या वेळेत राष्ट्रगान सादर करतील. प्रत्येक कार्यालयाच्या ठिकाणी उर्त्स्फूत सहभाग होवू इच्छिणाऱ्या नागरिकांचे ते-ते कार्यालय प्रमूख सन्मानाने नोंद घेवून त्यांचा सहभाग घेतील.

*जिल्ह्यातील सर्व शाळा घेणार उर्त्स्फूत सहभाग*
नांदेड जिल्ह्यातील भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला केले जाणारे हे अभिनव अभिवादन असेल असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. जिल्हा परिषद, सामाजिक न्याय व इतर शासकीय उपक्रमा अंतर्गत असलेल्या सर्व शाळा, विद्यालयाचे विद्यार्थी यात उर्त्स्फुत सहभाग घेणार आहेत. याचबरोबर खाजगी संस्थाही मोठया हिरीरीने पुढाकार घेत असून त्यांचा सहभाग ही याच उपक्रमाचा एक भाग राहील. प्रत्येक तालुका पातळीवर पंचायत समिती, शिक्षण विभाग यात पुढाकार घेवून 11 जानेवारी रोजी 11 वाजून 11 मिनीटांना सादर केल्या जाणाऱ्या राष्ट्रगानात सहभागी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.