रेमडेसविअरचा तुटवडा भरुन काढावा : प्रविण साले

नांदेड

नांदेड, बातमी24: –
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
परंतु जिल्ह्यासह तालुकास्तरावरील कोविड केअर सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध
करुन देण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत आहे. त्यातच रेमडेसविअर
इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने हा प्रकार कोरोना रुग्णांना
मृत्यूच्या दारेत नेणारा असून जिल्हा आरोग्य यंत्रणेने रेमडेसविअरचा
तुटवडा होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी दिला आहे.

वैद्यकीय सुविधेसाठी महापालिकेने अधिकारी नियुक्त केले आहेत. परंतु
मनपाचे हे काम केवळ कागदावर दिसून येत आहे. शहरातील अनेक कोविड
हॉस्पीटलसह शासकीय रुग्णालयात देखील बेडची कमतरता असून आता नव्यानेच
रेमडेसविअर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंजेक्शन व बेडसाठी
रुग्णांचे नातेवाईक फेर्‍या मारत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच शहर व
ग्रामीण भागात स्वॅब तपासणीसाठी किट उपलब्ध नाहीत. अ‍ॅन्टीजन टेस्टमध्ये
निगेटीव्ह आलेल्या रुग्णांच्या सिटी स्कॅन, एक्सरेमध्ये कोरोनो लक्षणे
प्रभावीपणे दिसत असतांना देखील त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करुन घेतले
जात नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. रेमडेसविअरचा
पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करावा, शासकीय व खाजगी रुग्णालयातील सुविधा
अद्यावत करुन कोणत्याचाही रुग्णाचा जिव जावू नये याची काळजी घ्यावी
अन्यथा भारतीय जनता पार्टी तिव्र आंदोलन करेल असा इशारा भाजपा
महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी दिला आहे.