आज होणार्‍या दलितवस्तीच्या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष

नांदेड

नांदेड, बातमी24ः- जिल्हा परिषदेच्या दलितवस्ती विकास निधीच्या वाटपासंदर्भात अनियमितता झाल्याचा ठपका भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य सौ. पुनम पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेली, असून या याचिकेवर शुक्रवार दि.19 जून रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देते, याकडे जिल्हा परिषद पदाधिकारी, काही अधिकारी व सदस्यांसह कंत्राटदार व सरपंचाचे लक्ष लागले आहे.

कोरोनाच्या महामारीचा जिल्हा सामना करता असताना जिल्हापरिषदेत पदाधिकारी, समाजकल्याण अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची दलितवस्तीचे आदेश काढण्याबाबत लगीन घाई सुरु होती. आदेश काढताना यापूर्वी विना ठराव क्रमांकाचा कार्यरंभ आदेश काढण्यात आले. मात्र बोबाटा उडाल्यानंतर अधिकार्‍यांनी सुधारणा केली.

आदेश देताना नियमांची पायमल्ली करण्याचा प्रयत्न केला गेला. नियमात बसत नसताना वाढीव दहा टक्के निधीचे आदेश काढले गेले. अनेक बाबींच्या बाबतीत पुनम पवार यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर यापूर्वी सुनावणी झाली होती. यावर दि.16 जून रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतु जिल्हापरिषदेचे प्रकरण पुढे आले नव्हते. तारीख वाढवून मिळाली होती. या प्रकरणी शुक्रवार दि. 19 जून रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देते, याकडे सगळयांचे लक्ष असणार आहे.