मेरी माटी-मेरा देश हा कार्यक्रम देशाला महान बनवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग:-खा.चिखलीकर

नांदेड

नांदेड,बातमी24:- देशाच्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ सुरू केलेल्‍या ‘मेरी माती, मेरा देश’ मोहीमेला जिल्‍हयात चांगला प्रतिसाद मिळाला असून नांदेड जिल्‍हयातील सर्व गावातून आलेल्‍या अमृत कलशातील माती आपल्या महान वीरांच्या सन्मानार्थ नवी दिल्ली येथे तयार करण्यात आलेल्या अमृत वाटिकेत पोहोचणार असून मेरी माटी-मेरा देश हा कार्यक्रम देशाला महान बनवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग असल्‍याचे नांदेड जिल्‍हयाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.

दिनांक 25 ऑक्‍टोबर रोजी जिल्‍हा परिषदेत आयोजित अमृत कलश यात्रा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, नांदेड-वाघाळा महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमर डोईफोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माळोदे, जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक डॉ. संजय तुबाकले, नेहरू युवा केंद्राचे अधिकारी चंदा रावळकर, नायगाव पंचायत समितीचे माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे, राजेश मोरे, डॉ. सचिन उमरेकर, सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राकुमार मुक्‍कावार, पंचायत विभागाच्या उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव-कापसे, महिला बाल विकास विभागाच्‍या उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी रेखा कळम-कदम, पाणी व स्‍वच्‍छता मिशनचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, नरेगाचे अमित राठोड, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, उपशिक्षणाधिकरी बंडू अमदूरकर आदींची मंचावर उपस्थिती होती.

पुढे ते म्‍हणाले, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्‍या संकल्पनेला देशभातून चांगला प्रतिसाद मिळाला. मेरी माटी-मेरा देश हा कार्यक्रम देशाला महान बनवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग बनवण्याचे माध्यम बनू शकतो, असेही ते म्‍हणाले. देभारातून सुमारे 7 हजार 500 कलश देशाची राजधानी नवी दिल्ली येथे पोहोचतील असेही ते म्‍हणाले. या कार्यक्रमाला आदरणीय पंतप्रधान महोदय, देशातले अनेक मान्यवर या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमाला जिल्‍हयातील प्रशासकीय यंत्रणा, सर्व सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी-कर्मचारी व लोकांनी योगदान दिल्‍याबद्दल त्‍यांनी सर्वांचे आभार मानले तसेच नेहरू युवा केंद्राचे 32 स्‍वंयसेवक हे 16 अमृत कलश घेऊन दिल्‍लीकडे जाणार आहेत, त्‍यांनांही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शुभेच्‍छा दिल्‍या.

यावेळी जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत म्‍हणाले, नांदेड जिल्ह्यातल्या या गोदाकाच्या भूमीला आपण दिल्‍ली येथे नेणार आहोत. यासाठी जिल्‍हा प्रशासनाने फारच सूक्ष्म नियोजन केले. जिल्हा परिषदेची सर्व यंत्रणा, महापालिका, सर्व नगरपालिका यांचे त्‍यांनी मनापासून अभिनंदन केले. प्रत्येक गावातने एक चिमूटभर माती घेऊन, ती माती एकत्रित करणे, यासाठी कुठलेही गाव सुटनार नाही याची काळजी सर्वांनी घेतल्‍याचे ते म्‍हणाले. याप्रसंगी मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक केले. त्‍या म्‍हणाल्‍या, भारताच्‍या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक गावात शीलाफलक उभारण्यात आले. त्या शीलाफलकावर वीरांचे नाव टाकण्यात आले आहे. तसेच आजी-माजी सैनिक तसेच विरांच्‍या कुटुंबांचा गौरव करण्‍यात आला. गावागावात पंच प्रतिज्ञा देखील घेण्यात आली. जिल्‍हा परिषदेच्‍या आरोग्य विभागाच्या वतीने 75 ठिकाणी अमृतवाटिका तयार करण्यात आले. माझी माती, माझा देश या उपक्रमात प्रत्येक गावातून मूठभर माती एकत्रित करून हा कलश दिल्‍ली येथील कार्यक्रमात रवाना करण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले.

यावेळी देशभक्‍तीपर गीत व मेरी माती मेरा देश या धरतीवरी शालेय विद्यार्थ्‍यांचा सांस्‍कृतीक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी तर उपस्थितांचे आभार उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्‍ट्रगीताने झाली. त्‍यानंतर पंचप्रण शपथ घेण्‍यात आली. या कार्यक्रमाला जिल्‍हा परिषदेचे अधिकरी, कर्मचारी, गट विकास अधिकारी, खाते प्रमुख, शालेय विद्यार्थी, नेहरु युवा केंद्राचे स्‍वंयसेवक, विस्‍तार अधिकारी, ग्रामसेवक आदींची उपस्थिती होती.