लसीकरणबाबत जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांनी दिल्या नवीन सूचना

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- प्रत्येक नागरिकांना कोविन लस मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. आपल्याला कल्पना असेलच की हे लसीकरण सुलभ व्हावे यादृष्टीने मतदानासाठी जसे बूथ निहाय नियोजन केले जाते तसेच आपण लसीकरणासाठी केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिली आहे.

पहिल्या व दुसऱ्या लसीमध्ये किमान व अधिकाधिक किती दिवस लसीकरण नागरिकांच्या आरोग्यासाठी हितकारक राहील या दृष्टीने केंद्रसरकारच्या अभ्यासगटाने यावर काही निष्कर्ष काढले आहेत. लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसमधे किमान 84 दिवसाचे अंतर ठेवण्याची शिफारस तज्ज्ञांनी केली आहे. या शिफारशीनुसार आपण आता दुसऱ्या लसीसाठी 42 दिवसांवरून 84 दिवसांपर्यंत कालावधी वाढविला आहे. हा बदल आपण आज दि. 14 मे च्या मध्यरात्री पासून लागू करीत असल्याचे डॉ.इटनकर यांनी कळविले.

यानुसार सर्वांनी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने;
पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसची बुकिंग ही 84 दिवसांनंतर कोवीन संकेतस्थळावर ऑनलाइन होईल.यापूर्वी ज्यांनी आधीच ऑनलाईन बुकिंग केली आहे ती बुकिंग कोवीन संकेतस्थलावरून आपोआप रद्द होणार नाही.

पहिले बुकिंग गृहीत धरून कृपया लसीकरण केंद्रावर आपण आलाच असाल तर तेथील जे आपले आरोग्य कर्मचारी आहेत ते काय सांगतात हे शांततेत समजून घ्या.

आपली पूर्व ऑनलाइन नोंदणी असली तरी त्या केंद्रावर आपण पूर्वी घेतलेला डोस उपलब्ध असेल तर ते निश्चित आपल्याला देण्याचा प्रयत्न करतील. मात्र डोस संपले असतील तर पुढील डोस बाबत ते योग्य माहिती देतील. नव्याने बुकिंकची जर आवश्यकता भासत असेल तर तसे ते मार्गदर्शन आपल्याला करतील. आपल्या सुविधेसाठी हे कर्मचारी काम करीत असून कृपया त्यांना आपण समजून घ्यावे,असे आवाहन डॉ.इटनकर यांनी केले.

नांदेड जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि सर्व कर्मचारी-अधिकारी कटिबद्ध होऊन कोरोना आव्हानावर काम करीत आहेत. आपल्या आरोग्यासाठी आम्ही दक्ष आहोत, वचनबद्ध आहोत. आपणही या जिल्ह्यातील सुजाण नागरिक म्हणून, मी जबाबदार, माझे कुटूंब माझी जबाबदारी ओळखून आपले कर्तव्य पार पाडाल असा विश्वास डॉ.इटनकर यांनी व्यक्त केला.