नांदेड,बातमी24:-आजकाल कोरोनाचा सात पेक्षा कमी स्कोर असला,तरी रुग्ण व त्यांचे नातेवाईक घाबरून जातात.मात्र 65 वय वर्षे आलेल्या एका वृद्ध इसमाने 25 स्कोर असताना कोरोनाच्या संसर्गावर मात करत सुखद धक्का दिला.या वृद्ध इसमाचा भेटी घेण्यासाठी खुद्द जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व काही अधिकाऱ्यांच्या टीमने रुग्णलय गाठले. येथे जाऊन त्या आजोबाचे पुष्प गुच्छ देऊन डॉ.इटनकर यांनी नव्या आयुष्यासाठी भरघोस शुभेच्छा देत आजोबाचे स्वागत केले.
लोहा तालुक्यातील जोमेगाव या गावातील सुमारे 65 वर्षाचे कोंडजी शिंदे यांना कोरोनाची लागण झाली होती.
तपासण्या झाल्या. सिटीस्कॅनचा स्कोअर थेट पंचवीसवर निघाला.जवळच्या नातलगांनी त्यांना उचलून नांदेड येथील जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील कोविड रुग्णालयात दाखल केले. वय आणि सिटीस्कॅनचा स्कोअर हे सारेच अधिक असल्याने उपचार करणारे डॉक्टर सुरवातीला चिंतेत होते.उपचारास शिंदे यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
कोविड रुग्णालयातील त्यांच्या आजूबाजूचे सारे रुग्ण बाबांचा स्कोअर ऐकून जीथे धास्तीत होते, या बाबांनी कोरोनाच्या आजाराला तोंड दिले.यातून त्यांचा ऑक्सिजन लेव्हल काढली.प्रकृतीत सुधारणा होत गेल्याने डॉक्टरांनी ऑक्सिजन काढला.योग्य उपचार व स्वतःला मधील आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी कोरोनावर दणदणीत मात केली.
डॉक्टरांनी त्यांना बळजबरी दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवून सर्व खातरजमा झाल्यानंतर आज रुग्णालयातून सूट्टी देण्याचा निर्णय घेतला. आजवरच्या कोविड उपचारात जिल्हा रुग्णालयातील ही सर्वोच्य सिटीस्कॅनची स्कोअर असलेली केस यशस्वी झाल्याने इतर रुग्णांचे आणि वैद्यकीय टिमचे मनोबल वाढावे, त्यांच्या अथक प्रयत्नांना शाबासकी द्यावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांची भेट घेवून त्यांना रुग्णालयातून शुभेच्छासह निरोप दिला. यावेळी नांदेड जिल्ह्याचे पालक अधिकारी तथा विभागीय उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सिरसीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुंडे आदी यावेळी उपस्थित होते.