देशाच्या खऱ्या इतिहासाला उजाळा देणार:- अशोक चव्हाण

नांदेड

नांदेड,बातमी24:-भारताचा स्वातंत्र्य लढा, त्याचे नायक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील वाटचाल, याबाबत मागील ५-६ वर्षांपासून देशवासियांची दिशाभूल केली जाते आहे. चुकीची, अर्धसत्य व विपर्यास करणारी माहिती जाणीवपूर्वक प्रसारित केली जाते आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून खऱ्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी काँग्रेस पक्षाने ‘व्यर्थ ना हो बलिदान, चलो बचाऐ संविधान’ हा उपक्रम सुरू केला असून, २४ ऑगस्टला नांदेडला हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे.

येथील आयटीएम कॉलेजमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. मंगळवारी सकाळी ११ वाजता कुसुम सभागृह येथे ‘व्यर्थ ना हो बलिदान, चलो बचाऐ संविधान’ हा कार्यक्रम तर दुपारी २ वाजता भक्ती लॉन्स येथे नांदेड, हिंगोली, लातूर, परभणी या चार जिल्ह्यांची आढावा बैठक आयोजित केली आहे. या कार्यक्रमांना महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, वर्षाताई गायकवाड, खा. सुरेश धानोरकर, शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, बसवराज पाटील आदी नेते प्रामुख्याने उपस्थित राहतील.

ते पुढे म्हणाले की, सध्या देशातील काही शक्ती युवापीढीला वास्तवापासून दूर नेत आहेत. ही बाब देशाच्या भवितव्यावर गंभीर परिणाम करणारी आहे. त्यामुळे नव्या पीढीला खरा इतिहास कळावा, स्वातंत्र्याचे मोल कळावे, संविधान आणि लोकशाहीचे महत्त्व कळावे, या हेतूने हा उपक्रम राबवला जात आहे. जगाच्या पाठीवर कुठेही धर्म आणि कट्टरवादाच्या नावावर देश चालवू पाहाल किंवा देशावर नियंत्रण मिळवू पाहाल तर त्याचे परिणाम किती गंभीर असतात, मुलभूत नागरी हक्कांची कशी गळचेपी होते, ते आपण आपल्या शेजारीच अफगाणिस्तानमध्ये बघतो आहे. भारतावर अशी वेळ कधीही येऊ नये, हा या मागचा हेतू आहे.

दुपारी नियोजित असलेल्या पक्षाच्या चार जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत संघटनात्मक बाबींवर चर्चा केली जाईल, असे सांगून अशोकराव चव्हाण यांनी यावेळी विकासात्मक व राजकीय विषयांवरील अनेक प्रश्नांनाही उत्तरे दिली. पत्रकार परिषदेला समन्वयक विनायक देशमुख, विधान परिषद प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत,आ.मोहन हंबर्डे,जिल्हा परिषद अध्यक्ष मंगारानी अंबुळगेकर,महापौर मोहिनी येवनकर,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलिकर,उपमहापौर मसूदखान,जिल्हा परिषद सभापती संजय बेळगे,स्थायी समिती सभापती विरेंद्रासिंग गाडीवाले,प्रवक्ते संतोष पांडागळे, मुंतजीब ,विजय येवनकर,नारायण श्रीमनवार उपस्थित होते.