नांदेड, बातमी24ः मागच्या सहा महिन्यांपासून कोरोना विरुद्धच्या लढाईत योद्धा म्हणून फ्रं टलाईनवर लढणारे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे अखेर सोमवारी कोरोना पॉझिटीव्ह आले. मात्र जिल्हाधिकार्यांनी पालकमंत्री, खासदार व इतर आमदारांप्रमाणे खासगी रुग्णालयात उपचार न घेता शासकीय रुग्णालयात उपचार सुरु केले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नीची प्रसूती सुद्धा शासकीय रुग्णालयात झाली होती.
नांदेड जिल्ह्यातील रुग्णांची संख्या साडे सहा हजार पार गेली असून त्यातील आठराशे रुग्ण हे अॅक्टीव्ह आले आहेत.कोरोनाला अटकाव लागावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करणारे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर हे स्वतः कोरोना पॉझिटीव्ह आले. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या एका स्वीय सहाय्यकाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःहून तपासणी केली, असता अंटीजन चाचणीत ते कोरोना पॉझिटीव्ह आले.
चाचणीत पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व रुग्णांची चाचणी करण्याचे आवाहन सुद्धा डॉ. इटनकर यांनी केले. त्याचसोबत ते एखादा खासगी रुग्णालयात जाऊन उपचार सुद्धा घेऊ शकले असते. मात्र तसे न करता त्यांनी शहरातील शासकीय रुग्णालयात स्वतःवर उपचार सुरु केले आहेत. यापूर्वी सुद्धा त्यांच्या पत्नीची प्रसूती शामनगर येथील महिला व बालरुग्णालयात केली होती. याबद्दल जिल्हाधिकारी व त्यांच्या कुटुंबियांचे सर्वस्तरातून स्वागत व अभिनंदनाचा वर्षाव झाला होता.
यापूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर ते मुंबई येथे उपचारासाठी गेले होते. यावरून खासदार चिखलीकर यांनी टीका केली होती. त्यानंतर चिखलीकर हे पॉझिटीव्ह आल्यानंतर ते औरंगाबाद येथे उपचारासाठी गेले होते. चव्हाण यांच्यावर केलेली टीका चिखलीकर यांच्या अंगलट आली होती. यानंतर जिल्हयातील आमदारांनी सुद्धा जिल्हयाबाहेर जाऊन उपचार घेतले होते. मात्र जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी तसे न करता शासकीय रुग्णालयाच्या उपचार पद्धतीवर विश्वास वाढविण्याचे काम स्वतःहून केले आहे. हा एकाप्रकारे आदर्श त्यांनी घालून दिल्याचे बोलले जात असून हा आदर्श लोकप्रतिनिधींनी सुद्धा अंमलात आणल्यास वैद्यकीय उपचार पद्धतीबाबत सामान्यांच्या मनात विश्वास वाढू शकतो.