सत्यवादी होण्याच्या प्रयत्नात आमदार राजेश पवार मतदारसंघात एकांकी

राजकारण

जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24ः- नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार हे या वेळी हात मोकळा सोडल्यामुळे भरघोस मतांनी आमदार झाले. मात्र आमदार झाल्यानंतर राजेश पवार यांना सत्यवादी राजा हरिषचंद्राचा साक्षात्कार व्हायला लागला असून मतदारसंघात रामराज्य अवतरल्यासारखे त्यांना भासत आहे. त्यामुळे ते वाळू,राशन व अधून-मधून पोलिसांच्या विरोधात उभे राहतात, कधी-कधी तर माझे कुणीच ऐकत नाही, असे निवेदन पालकमंत्र्यांना देतात. या सगळया बाळ कारभारामुळे राजेश पवार मतदारसंघात एकांकी पडू लागले आहेत.

तीन तालुक्यांचा एक मतदारसंघ असलेल्या नायगाव विधानसभा मतदारसंघात राजेश पवार यांनी सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांचा पराभव करून ते आमदार झाले. वसंत चव्हाण यांच्यावरील दहा वर्षांमधील नाराजी तसेच राजेश पवार यांनी हात न अखडता घेतल्यामुळे विजयाचे सोपान गाठणे शक्य झाले. यासाठी भाजपने सुद्धा त्यांच्या विजयासाठी ताकद उभी हे सुद्धा तितकेच सत्य आहे.

आमदार झाल्यापासून मतदारसंघातील एकाही भाजप नेत्यांसोबत पवार यांचा संपर्क राहिला नाही. पती-पत्नी मतदारसंघाचे कारभारी असे चित्र निर्माण झाले आहे. मतदारसंघात आमदार पवार हे कधी येऊन जातात, याचा पत्ता सुद्धा कार्यकर्त्यांना लागत नाही. कधी तरी सोशल मिडियावरून समजून जाते. पक्षातील नेते व कार्यकर्त्यांमधून आमदारांच्या कार्यशैलीवर नाराजीची लाट निर्माण झालेली आहे.

पक्षांतर्गत नाराजी असताना प्रशासनामधून त्यांच्याविरोधात सुप्त वाद सुरु असतो. पोलिस अधीक्षकांपासून ते मतदारसंघातील पोलिस प्रशासनावर ते अधून-मधून पत्रकाबाजी करत असतात. वाळू व राशन दुकानदारांविरुद्ध ते बंड करून उठले आहेत. बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांशी त्यांचे तसेच खटके उडत असतात. प्रशासनाला सोबत घेऊन विकास साधण्याऐवजी माझे अधिकारी ऐकत नाही,अशा प्रशासनाला समजावा, असे साकडे ते थेट पालकमंत्री अशोक चव्हाण यांना घालतात. आमदार राजेश पवार यांचे नेमके चालायले काय असा सवाल जिल्ह्यातील जनतेला पडला आहे.

प्रशासनाविरोधात बंड झाला, की वाळू व राशन माफि यांकडून माझ्या जिविताना धोका आहे, अशाही त्यांना अचानक साक्षात्कार होतो. याचा गाजावाजा केल्यानंतर औरंगाबादरच्या डीआयजी कार्यालयाचे पथक चौकशी करून जाते. त्यात खोदा पहाड निकला चुहा असेच होते. ज्या मतदार संघाचा लोकप्रतिनिधी स्वतःला सुरक्षित समजत नाही, त्या मतदारसंघातील जनता कशी काय सुरक्षित असू शकते, असे आता जनाला वाटू लागले आहे. या सगळया बाळ कारभारामुळे सहा महिन्यात मतदारसंघातील पक्षांतर्गत, प्रशासकीय पातळीवर व जनतेच्या नजरेत आमदार राजेश पवार हे एकांकी पडू लागले आहेत.