जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः आतापर्यंत राजकारणात काका व पुतण्याची लढाई सर्वसुत राहिली आहे. मात्र नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा सेवानिवृत्त सनदी अधिकारी शामसुंदर शिंदे यांच्या एका अधिकार्याविरुद्धच्या मोहिमेला भाच्चे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांनी त्याच अधिकार्याच्या अभिनंदनाचा ठराव घेऊन छेद देण्याचा प्रयत्न केला आहे.
आमदार शामसुंदर शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता बारगळ हटाव मोहीम सुरु केली आहे. बारगळ यांच्या संदर्भाने अनियमितता केल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद सदस्यांकडून केल्या जात असतात.वेगवेगळया हेडच्या कामे न करताच बिले उचलल्याचा आरोप आहे. वैद्यकीय रजेची सुद्धा मोठी रक्कम उकळण्याचा आरोप आहे, तसेच माळेगाव येथील पाणी पुरवठा योजनेच्या कामात अनियमितता झाल्याच्या तक्रारी खुद आमदार शामसुंदर शिंदे यांच्या आहेत.
या संदर्भाने आमदार शिंदे यांचे बारगळ यांची उचलबांगडी करण्यात यावी, या मागणीसाठी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा सुरु केला आहे. बारगळ यांना हटविण्यात यावे, यासाठी दोन राज्यमंत्र्यांच्या शिफ ारशी आहेत. तरी सुद्धा जिल्हा परिषदकडून कारवाई झालेली नाही.आमदार शिंदे हे बारगळ यांच्यावर कारवाई केली जावी, यासाठी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी तळ ठोकून असतात.
आमदार शिंदे व बारगळ असा वाद सर्वसुत असताना खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे जिल्हा परिषद सदस्य चिरंजीव प्रवीण पाटील यांनी मात्र बारगळ हे चांगले अधिकारी आहेत. त्यांची कामे करण्याची पद्धती उत्कृष्ट असल्याचे म्हणत नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा ठराव मांडला. यामागे प्रवीण पाटील चिखलीकर यांची राजकीय खेळ असल्याचे बोलले जात आहे.
प्रताप पाटील चिखलीकर हे खासदार झाल्यानंतर लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघावर प्रवीण पाटील चिखलीकर यांनी आमदारकीसाठी दावा ठोकला होता. तर शिंदे यांना आमदारकीचे तिकिट हवे होते. त्यावरून शिंदे-चिखलीकर कुटुंबियात वाद सुरु झाला होता. त्या निवडणुकीत चिखलीकर कुटुंबियांनी संपूर्ण ताकद शिंदे यांच्या बाजूने लावली होती. मात्र विजयीनंतर शिंदे व चिखलीकर कुटुंबियात पडलेले विस्तव शमण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे आमदार शिंदे मामा यांच्या बारगळ विरोधी मोहिमेला भाचा प्रवीण पाटील यांनी अभिनंदनाचा ठराव मांडून छेद देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरु झाली आहे.