जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः-कोरोनाची प्रशासनाकडून दिली जाणारी आकडेवारी अपूर्ण माहितीचा भांडार ठरत आहे. प्रशासकीय माहिती माध्यमांना गोधळात टाकणारी तर जनतेला प्रशासनाकडून दिशाभूल करणारी ठरत आहे. त्यामुळे कोरोनात खेळ आकडयांचा की माकडांचा असा प्रश्न सामान्यांना प्रशासनाच्या बाबतीत निर्माण होत आहे.
सुरुवातीच्या काळात कोरोनाचा रुग्ण पॉझिटीव्ह आला,की प्रशासनाक डून माहिती माध्यमांना प्रेसनोटच्या माध्यमातून कळविली जात होती. मात्र सायंकाळी पाच वाजेच्यानंतरच अधिकृत प्रेसनोट काढली जात आहे. या नोटमध्ये बर्याच वेळी माहितीचा अभाव असतो.
निवडणुक विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांना नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. माध्यमांना माहिती कळविण्याची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांकडून मिळणारा अहवाल पाठविण्याची बर्याच वेळा डॉ. निळकंट भोसीकर व प्रशांत शेळके यांच्या चढाओढ लागल्याचे बघायला मिळाले आहे.
प्रशांत शेळके हे सुद्धा वेळोवेळी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु त्यांच्याकडे येणारी माहिती अर्धवट स्वरुपाची असते. अर्धवट माहितीवरून बर्याच वेळा माहिती विचारण्याचा प्रयत्न केला, की हतबल होऊन सांगतात, जितकी माहिती मला मिळते, तितकी देण्याचा माझा प्रयत्न असतो. माझ्यापर्यंत पूर्ण माहितीच येत नाही, उपजिल्हाधिकारी असलेल्या अधिकार्याकडे पुर्ण माहिती न येणे हे एकाप्रकारे हस्यास्पद म्हणावे, की जिल्हा शल्य चिकित्सांकडून फ ारस महत्व दिला जात नाही?
अपूर्ण माहितीबद्दलही माध्यमांकडून समजून घेण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु कोरोनाच्या संदर्भातील आकडेवारी बाबत घातला जात असलेला घोळ दोन अधिकार्यांमधील समन्वयाचा अभाव दाखवून देणारा आहे. जिल्हा शल्यचिकित्यांकडून आलेल्या नोटमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या 304 सांगण्यात आली, तर नोडल अधिकारी प्रशांत शेळके कोरोनाचे रुग्णसंख्या 301 म्हणत आहे. सुरुवातीला नेमकी आकडेवारी कोणाची खरी समजायची असा प्रश्न निर्माण झाला होता.
यावर प्रशासनाकडून 301 रुग्ण असल्याचे नोट काढण्यात आली. परंतु त्यावर शेळके किंवा डॉ. भोसीकर यांची स्वाक्षरी दिसून आलेली नाही. त्यामुळे नोट अधिकृत कसे समजायचे असा प्रश्न ही निर्माण होतो.
शुक्रवार दि.19 जून रोजी आलेले तीन नवे रुग्ण यामध्ये दोन पुणे व एक हैदराबाद येथून आले असून ते स्थलांतरीत असल्याने त्यांची नांदेड जिल्ह्यातील रुग्णांनामध्ये नोंद होत नसल्याचा खुलासा शनिवारी सांयकाळी शेळके यांनी केला. मात्र शुक्रवारी माहिती देताना शेळके यांनी या रुग्णांची माहिती देताना कोरोनाची आकडेवारी तिनशे झाल्याचे नमूद केले होते. या आकडेवारीवरून शेळके व भोसीकर यांना माघार घ्यावी लागली आहे. हा प्रकार नवा नसून यापूर्वी सुद्धा असे प्रकार प्रशासनाकडून झाले आहेत. त्यामुळे कोरोनात खेळ आकडयांचा की माकडांचा प्रश्न सामान्यांचा मनाला स्पर्श करून जात आहे.