सभेत सदस्यांनी घेतले पदाधिकारी-अधिकार्‍यांवर तोंडसुख

नांदेड

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष सभागृहात एक वर्षांच्या कालखंडानंतर झाली. ऑनलाईन सभेस सुरुवातीपासून विरोध करणार्‍या सदस्यांनी मात्र आजच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत पदाधिकार्‍यांसह अधिकार्‍यांवर तोंडसुख घेतले. तब्बल सहा तास ताणून धरलेल्या सभेत लोकभिमुख किंवा विकास कामांना गती देता येईल, असे ठराव किंवा चर्चा मात्र फ ारशी पटलावर येऊ शकली नाही.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. 5 फ्रे बुवारी रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. सभेचे प्रमुख जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर,उपाध्यक्ष पद्मा रेड्डी, सीईओ वर्षा ठाकूर, शिक्षण सभापती संजय बेळगे, महिला व बालकल्याण सभापती सुशीला बेटमोगरेकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, लेखा व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगणे, सभेचे सचिव सुधीर ठोंबरे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

सभेच्या सुरुवातीला प्रत्येक अधिकारी, पदाधिकारी व सदस्यांची कोरोना संदर्भात अंटीजन चाचणी करून सभागृहात प्रवेश देण्यात आला. यात काही सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आले. यामध्ये समाजकल्याण सभापतीसह पाच जिल्हा परिषद सदस्य व दोन अधिकार्‍यांचा समावेश आहे. यात कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या भाजपच्या पुनम पवार यांनी चाचणीचा अहवाल नाकारण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे मी सभागृहातून बाहेर पडणार नाही. मोठा खर्च करून सभेस आल्याचे सांगत माझा प्रवास खर्च कोण देणार असा बाश्कल प्रश्न केल्यावरून जि.प.अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर संतापल्या, खर्च तर कुणावर उपकार केले काय? असा प्रतिसवाल केला. अखेर पुनम पवार यांना सभागृहातून बाहेर जावे,अशी विनंती करण्यासाठी सीईओ सह पदाधिकार्‍यांना हात जोडावे लागले.

अचानक चाचण्या का घेण्यात आल्या, या मुद्दावरून साहेबराव धनगे यांनी घरचा आहेर देण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍यांना केला. यात काही पदाधिकार्‍यांची सुद्धा भर पडली. त्यामुळे अंटीजन चाचणीच्या मुद्दावरून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शासनाच्या नियमांचे पालन करून सभा घेत असल्याचे प्रशासनाकडून ठणकावून सांगण्यात आले. त्यामुळे कोरोनाच्या चाचण्यावरून निर्माण झालेल्या वादंगावर पडदा पडला.

एकाच टेबलवर अनेक वर्षे राहणार्‍या कर्मचार्‍यांकडून सदस्यांना मान राखला जात नाही. सदस्यांना अप्रत्यक्षरित्या अपमानित केले जाते. असा मुद्दा माणिकराव लोहगावे यांनी लावून धरला. अशा कर्मचार्‍यांवर कारवाई कधी केली जाणार असा सवाल त्यांनी केला. यावर सीईओ वर्षा ठाकूर यांनी कोणता कर्मचारी किती वर्षांपासून एका टेबलवर काम करतो, या संदर्भाने माहिती घेऊन निश्चितच कारवाई केली जाईल,असे आश्वासन सभागृहाला दिले.

वर्षे लोटले, तरी विविध विभागांच्या समिती का स्थापन केल्या जात नाहीत, विहित मुदतीत समित्यांची स्थापना न केल्याच्या मुद्ावरून शीला निखाते यांनी पदाधिकार्‍यांसह प्रशासनाला धारेवर धरले. या विषयावरून समाधान जाधव यांच्यासह अन्य सदस्यांनी सभागृह दणाणून सोडण्याचा प्रयत्न केला. कोरोना असल्यामुळे विविध समित्या स्थापन होऊ शकल्या नाहीत,मात्र पुढील काळात यावर निर्णय घेतला जाईल,असे मंगाराणी अंबुलगेकर यांनी सांगितले.

माझे गाव सुंदर गाव, माझी शाळा सुंदर शाळा कार्यक्रमाबाबत सीईओ वर्षा ठाकूर यांच्या अभिनंदनाचा ठराव लोहगावे यांनी मांडला, यास बास्टेवाड यांनी अनुमोदन दिले.अर्धापूर बीडीओ कामे करत नसल्याच्या मुद्दावरून बबन बारशे यांनी सदर बीडीओ महिलेस सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी केली. या विषयात इतर सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत तात्काळ कारवाईची मागणी लावून धरली. चौकशी करून शासनाला अहवाल कळविला जाईल,असे आश्वासन ठोंबरे यांनी दिले.

तरोडच्या जागेच्या अतिक्रमणावरून सदस्य विरुद्ध अधिकारी असा वाद बराच वेळ विकोपा गेल्याचे बघायला मिळाले. काही सदस्यांनी अधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीवर बोट दाखविण्याचा प्रयत्न केला. यावरून सीईओ ठाकूर यांनी खुलासा करत या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन देत ज्यांनी अतिक्रमण केले, अशांवर गुन्हे नोंद केले जातील,अशी ग्वाही सभागृहाला दिली. त्यांनतर समाजकल्याण मधील 23 लाख रुपयांच्या अपहाराचा प्रयत्न ही चर्चेला आला. या प्रकरणी फ ौजदारी कारवाई करण्याचा मागणी सदस्यांनी लावून धरण्यात आली. प्रशासनाकडून कारवाईसंबंधी पत्रव्यवहार केला जाईल, असे शरद कुलकर्णी यांनी सांगितले.