खाजगी रुग्णालयांना प्रशासनाची पुन्हा ताकीद ; ट्रेस, टेस्ट व ट्रिट त्रिसुत्रीचा अवलंब

नांदेड

नांदेड, बातमी24ः- खाजगी रुग्णालयात इतर उपचारासाठी आलेले रुग्णांमध्ये जर कोविड-19 ची लक्षणे आढळली तर अशा रुग्णांना तात्काळ शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात यावे, यापूर्वी तसे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश काढले होते. मात्र तसे अनेक ठिकाणी असे होत नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाने खासगी रुग्णालयांना ताकीद दिली आहे.

जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या आठराशेपेक्षा अधिक झाली आहे. या सगळया पार्श्वभूमिवर कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेले आणि पन्नास वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींनी तसेच विदेशातून, अथवा इतर राज्यातून किंवा इतर जिल्ह्यातून प्रवास केला आहे, अशा सर्व नागरिकांची तपासणी करण्याची मोहिम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे.

त्या अनुषंगाने खाजगी रुग्णालयामध्ये व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांच्या क्लिनिकमध्ये कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे समोर आले आहे. अशा प्राथमिक लक्षणे असलेल्या रुग्णांना खाजगी रुग्णालयांनी तिथे उपचार न करता तात्काळ पुढील उपचारासाठी शासकिय रुग्णालय किंवा कोविड केंद्रावर पाठविणे आवश्यक आहे. तसे यापूर्वीच् आवाहन प्रशासनाने पत्र काढून केले होते. मात्र तसे बहुतांशी ठिकाणी असे होत नाही, असे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे बाधित रुग्णांना वेळेवर उपचाराच्या दृष्टीने खाजगी डॉक्टरनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.