जिल्ह्यात कोरोना दणका कायम; रुग्ण संख्या जवळपास दोन हजार

नांदेड

नांदेड, बातमी24ः मागच्या काही दिवसांमध्ये पावसाची सरी बरसणे कमी झाले असले, तरी कोरोनाची रुग्णांची संख्या धो-धो पावसासारखी वाढत आहे. आजही रुग्णसंख्या दीडशेपर्यंत गेली आहे. त्यामुळ जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या जवळपास दोन हजार इतकी झाली आहे.

जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या चाचण्यांची गती व्यापक केल्यामुळे रुग्णसंख्या बाहेर येत आहे. त्यामुळे रुग्णांचे आकडे मोठया संख्येने बाहेर येत आहेत. शनिवार दि. 1 ऑगस्ट रोजी तब्बल 1 हजार 281 चाचण्या घेण्यात आल्या. यात एक हजार 88 अहवाल निगेटीव्ह आले तर 147 स्वॅबचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यामध्ये आरटी-पीसीआर तपासणीमध्ये 96 तर अंटीजन किटव्दारे 51 जणांचे स्वॅब पॉझिटीव्ह आले. त्यामुळे जिल्हयातील रुग्ण संख्या 1 हजार 986 एवढी झाली.

रुग्णांची संख्या वाढत असताना बरे होणार्‍या रुग्णांची संख्या ही दिलासा देणारी ठरत आहे. शनिवारी 48 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 935 इतकी झाली आहे. तर मागच्या चौविस तासांमध्ये दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नांदेड येथील दत्त नगर येथील 48 वर्षीय रुग्णाचा दि. 31 जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात मृत्यू तर चिराग गल्ली येथील 75 वर्षीय पुरुषाचा विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
——
आरटी-पीसीआर चाचणीमध्ये 21 रुग्ण हे हदगाव तालुक्यातील तामसा येथील आहेत.7 रुग्ण हे नांदेड शहरातील गीता नगर, वसंत नगर-6,त्यानंतर नांदेड शहरातील प्रत्येक भागात एक पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ही रुग्ण संख्येचा वेग कायम आहे.