आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागाचा कणा; सीईओ ठाकूर यांचे प्रतिपादन

नांदेड

नांदेड,बातमी24:- वैद्यकीय अधिकारी हे ग्रामीण भागाचा कणा असून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा सदैव तत्पर असते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आज जिल्हा परिषदेत राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त वर्ष 2022: फॅमिली डॉक्टर्स ऑन द फ्रंट लाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन सीईओ वर्षा ठाकूर’घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी त्‍या बोलत होत्या.  या कार्यक्रमाला उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, प्रशासकीय अधिकारी डॉ. अनिल रुईकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, मानसरोग तज्ञ डॉ. प्रणाद जोशी, शिवप्रिया बहनजी, प्रा. डॉ. संपदा संत, डॉ. सुमित कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, कोविड काळात आरोग्य यंत्रणेतील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आशा वर्कर व अंगणवाडी कार्यकर्तींनी ग्रामीण भागात खूप चांगले काम केले आहे. कोविड नंतर आता डोळ्यांचे व ईतर आजारांची तपासणी करण्यासाठी सर्वांपर्यंत आपल्या यंत्रणेला पोहोचावे लागेल. ग्रामीण भागात आरोग्याचे मोहीम सशक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी काम करणे आवश्यक आहे. शाळा स्तरावर मुलांच्या आरोग्याची तपासणी, स्वच्छता व मुलींच्या आरोग्याच्या प्रश्नांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र मध्ये रंगरंगोटी करून बोलक्या भिंती कराव्यात. विविध आजार व उपचारांची माहिती त्यामध्ये द्यावी. आरोग्य केंद्रात पाण्याची सुविधा नसल्यास जल जीवन मिशन मधून नळ जोडणी घ्‍यावी. ग्रामीण भागात तुमची गरज असून योग्य पद्धतीने नागरिकांना आरोग्याच्या सुविधा द्याव्यात असेही त्या म्हणाल्या.
यावेळी ताणतणाव्यवस्थापन याविषयी डॉ. प्रणाम जोशी, योगा व ध्यान याविषयी शिवप्रिया बहनजी व डॉ. संपदा संत, आपत्कालीन वैद्यकीय सेवा या विषयावर डॉ. सुनील कुलकर्णी तर न्याय वैद्यकीय शास्त्र याविषयी डॉ. ऋषिकेश देशपांडे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व जिल्हास्तरीय अधिकारी यांची उपस्थिती होती

*योगा व ध्यान महत्त्वाचे*
इतरांच्या आरोग्याची काळजी घेताना डॉक्‍टर्स व आरोग्‍य यंत्रणेतील कर्मचा-यांनी  स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. नियमित फिरणे, योगा, प्राणायाम, हलका व्‍यायाम यासह ध्यान करणे आवश्यक असल्‍याचे मत मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. मनशांतीसाठी ध्यान महत्त्वाचे असून नियमित ध्‍यानाचा सराव करावा, ध्यान केंद्रात जाऊन ध्यानाचा अनुभव घ्‍यावा असेही त्‍या म्‍हणाल्‍या.