नांदेड, बातमी24ः- शिक्षकांना प्रत्येक वेळी शासनाच्या तालावर नाचावे लागत आहे. कधी ऑफ लाईन तर कधी ऑनलाईन बदल्यामुळे शिक्षकांना मनस्पाप सहन करावा लागत असताना शिक्षक संघटना मात्र गुळगिळून गप्प असतात. पूर्वी शिक्षकांच्या प्रश्नांवर आक्रमक राहणार्या शिक्षक संघटना नांग्या टाकून असल्याचे बघायला मिळत.
दोन वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन सुरु झाली. यात काही बाबतीत चुका होत असल्या तरी, भ्रष्टाचार मात्र शून्यावर आला. नियमांप्रमाणे माहिती भरा,नियमांप्रमाणे बदली ठिकाणी जा ही पद्धती एका प्रकारे चांगली होती. पहिल्या वर्षी काही चुका झाल्या परंतु त्यातील पादर्शकता नितळ होती.
नवे सरकार सत्तेवर येताच मागचेच पाढे गिरवायला सुरुवात केली आहे. बदल्यांची प्रक्रिया ऑफ लाईनवर आणून ठेवत या प्रक्रियेत अनियमितता व काही शिक्षकांवर अन्याय करायला वाव मिळवून दिला आहे.मुळात कोरोनामुळे बदल्या करू नयेत, असे नियम याच सरकारने काढला. याच सरकारने बदल्या होणार असे जाहीर केले.
सरकारने शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश विविध शिक्षक संघटनांनी हाणून पाडायला हवा होता. बदल्या करायच्याच होत्या. तर ऑफ लाईन ऐवजी ऑनलाईन करण्यात याव्यात अशी मागणी शासनदरबारी ताकद लावून पुढे रेटायला हवी होती. यावर काही बोटावर मोजण्याइतक्या संघटना सोडल्या तर कुणाही काहीच बोलत नाही. यात संघटना पदाधिकार्यांना सुट मिळत असली, तरी त्या संघटनेत काम करणार्या शिक्षकांना कायम संघर्ष करावा लागत आला.
जिल्ह्यात विस्तार अधिकारी संघटना, पदवीधर शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघटना, आखिल महाराष्ट्र शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना, शिक्षण परिषद, इफटा शिक्षक संघटना, पुरोगामी शिक्षक संघटना, महाराष्ट्र शिक्षक सेना, महाराष्ट्र शिक्षक संघटना, राष्ट्रवादी शिक्षक संघटना अशा किती तरी संघटना आहेत. परंतु शिक्षकांच्या ऑफ लाईन बदल्याववरून कुणी गळा काढायला तयार नाही. उलट सरकार व प्रशासनावर नांग्या टाकून असल्याचे बघायला मिळत.
——-
संघटनांना हाताशी धरून….
विविध शिक्षक संघटनांना हाताशी धरून बदल्यांमध्ये मोठी अनियमितता केली जाऊ शकते. तशी तयारी प्रशासनाने चालविली आहे. मात्र यात शिक्षक संघटना पदाधिकार्यांचे काही तरी चालू शकेल पण शिक्षकांच्या हक्काचे काय याचा जाब शिक्षक मात्र त्या-त्या संघटनेच्या पदाधिकार्यास विचारल्याशिवाय राहणार नाहीत.