नांदेड,बातमी24:-पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवून मराठवाडा विभागाची तूट भरून काढण्याची योजना कालबद्धपणे पूर्ण निर्णय घेतला आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलविलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ शासकीय निवासस्थास्थानी जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सिताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते. तर जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविणे, वैनगंगा-नळगंगा प्रकल्प असे जलसंपदा विभागाने हाती घेतलेले महत्वपूर्ण प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असे स्पष्ट निर्देश दिले.
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सातत्याने मराठवाड्याची पाणी तूट भरून काढण्यासाठी पाठपुरावा चालवला आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवून मराठवाड्याची पाणी तूट भरून काढावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मराठवाड्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण करण्याची मागणी चव्हाण यांनी यावेळी केली. तसेच महत्त्वाकांक्षी लेंडी प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावा, असाही आग्रह त्यांनी धरला. या मागणीवर देखील उद्धव ठाकरे व जयंत पाटील यांनी अनुकूलता दर्शवली आहे.
मराठवाडा आणि नांदेड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या अनेक अडचणींवर यावेळी चर्चा झाली. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आंतरराज्य स्तरावर काही अडीअडचणी येत असतील तर संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मी स्वत: बोलेन, असे मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले. त्यामुळे बाभळी बंधाऱ्याच्या प्रश्नावर आता स्वतः मुख्यमंत्री हस्तक्षेप करून तेलंगणा राज्याशी बोलणी करणार असल्याचे स्पष्ट आहे.
त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांबाबतही यावेळी चर्चा झाली. २६ जून रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नांदेड दौऱ्यात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सिंचन प्रकल्पांविषयीच्या जिल्ह्यातील अडचणी निदर्शनास आणून दिल्या होत्या. या अडचणी सोडविण्यासाठी २ जुलै रोजी मंत्रालयातील चव्हाण यांच्या दालनात पुन्हा जलसंपदा मंत्र्यांसमवेत बैठक झाली होती. त्यानंतर काल झालेल्या बैठकीतही नांदेड जिल्ह्याच्या समस्या निकाली काढण्यासाठी अशोकराव चव्हाण यांनी पाठपुरावा केला.