विधानसभेसाठी आज-उदया विशेष मतदार नोंदणी अभियान

नांदेड

नांदेड,बातमी24 : विधानसभा निवडणुकीसाठी ज्या अठरा वर्षावरील नागरिकांचे नाव मतदान यादीत नसतील किंवा ज्यांच्या घरी कोणी मृतक झाले असेल तर त्यांचे नाव वगळण्यासाठी उद्या शनिवार 10 ऑगस्ट व रविवार 11 ऑगस्ट रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविले जात आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये मतदार प्रारूप यादीचे दुसरे पुननिरीक्षण अभियान 6 ऑगस्ट पासून सुरू झाले आहे. नागरिकांसाठी शनिवार व रविवार या दोन सुट्ट्यांच्या दिवशी विशेष मतदान नोंदणी अभियान उद्या दिनांक 10 व परवा दिनांक 11 ऑगस्ट रोजी राबविण्यात येणार आहे. याशिवाय पुढच्या आठवड्यात दिनांक 17 व 18 ऑगस्ट रोजी हे अभियान राबविण्यात येणार आहे.

मतदार यादीमध्ये आपले नाव नसेल तर नोंदणी करण्यासाठी 20 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. विधानसभेमध्ये मतदान करण्यासाठी आपली नावे मतदान यादीत आहे, हे माहिती करून घेण्यासाठी तसेच आपल्या हरकती व दावे नोंदविण्यासाठी 20 ऑगस्टपर्यंत संधी आहे. 30 ऑगस्टला ही प्रक्रिया पूर्ण होणार असून त्यानंतर अंतिम होणाऱ्या यादीतील मतदारांनाच विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करता येणार आहे, याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील किनवट,हदगाव,भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायगाव, देगलूर व मुखेड या नऊ विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी उद्या मतदार केंद्रावर उपलब्ध असणाऱ्या बीएलओकडून अर्ज भरून घ्यावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.