टाळेबंदीच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष

नांदेड

नांदेड, बातमी24ः- इतर जिल्ह्यांप्रमाणे नांदेड जिल्ह्यात टाळेबंदी लावण्यात यावी,यासाठी जनतेतून वाढता दबाव पाहता, जिल्हाधिकारी हे व्यापार्‍यांशी संवाद साधून टाळेबंदीसंबंधी निर्णय घेणार आहेत. या निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात टाळेबंदी लागणार या संदर्भाने सोमवार दि. 6 जुलै दुपारपासून चर्चा सुरु होती. यासंबंधी पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यात ही चर्चा झाली, असून टाळेबंदीसाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा हिरवाकंदील दिला आहे. त्यामुळे टाळेबंदीसंबंधी औपचारिकता म्हणून व्यापार्‍यांशी संवाद साधला जाणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येते.

शेजारच्या हिंगोली, परभणी जिल्हयासह औरंगाबाद, बीड, जालना या जिल्ह्यात टाळेबंदीबाबत वेळोवेळी आदेश काढले जातात. मात्र नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकार्‍यांनी स्वतःहून टाळेबंदीचा निर्णय घेतला नाही. दुसरीकडे दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. समुदय कोरोनाला आळा बसला पाहिजे, या उद्देशाने टाळेबंदीची कडक अंमलबजावणी केली जावी, यासाठी होणारी मागणी लक्षात घेता, दि. 9 जुलैपासून टाळेबंदीचे आदेश लागू शकतात. त्यामुळे आज होणार्‍या व्यापार्‍यासोबतच्या चर्चेनंतर यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते.