जिल्हाधिकारी उघडा डोळे बघा नीट; निकृष्ट जेवनात एकच चपाती

महाराष्ट्र

नांदेड, बातमी24ः विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील रुग्णांना कोरोनाच्या संसर्गापेक्षा भुकमारीचा सामना मागच्या चार ते पाच दिवसांपासून करावा लागत आहे. वेळेवर चहा, नाश्ता व जेवन मिळणे बंद झाले आहे. शिवाय दिले जाणारे जेवनाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. जेवन हे पोटभर सुद्धा मिळत नसल्याचे रुग्णांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी महोदय उघडा डोळे बघा नीट, अन्यथा रुग्ण कोरोनाच्या संसर्गापेक्षा तेथील होत असलेल्या उपासमारी व निकृष्ट खाद्यांमुळे मरण्याची शक्यता अधिक होऊ शकते.

नांदेडमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनासमोर चिंतेचे ढग दिवसेंदिवस दाटून येत आहे.परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. आजघडिला 3 हजार 700 कोरोनाचे रुग्ण झाले आहेत. तर 135 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गंभीर रुग्णांची संख्या दीडशेपेक्षा जास्त आहे. दिवसाला सरासरी पाच जणांचा मृत्यू कोरोनामुळे होऊ लागला आहे.

विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना विभागात मागच्या चार ते पाच दिवसांपासून रुग्णांची जेवनावाचून मोठी तारांबळ उडत आहे. पूर्वी जेवनाचा दर्जा उत्तम होता. वेळेवर दोन वेळ चहा, नाश्ता ठरल्याप्रमाणे बारा वाजता व सायंकाळी जेवन मिळत असत. यात जेवनाचा दर्जा ही उत्तम राखला जात असत. एकाच चार पोळया, चवदार भाजी, वरण व त्यात एक गोड पदार्थ असा मेनू ठरलेला होता.

चार ते पाच दिवसांपासून रुग्णांच्या जेवन, नाश्ताच्या वेळा पार बिघडून गेल्या आहेत. यात अनेक शुगर व बिपीचे रुग्ण ही आहेत. अशा रुग्णांना जेवन व नाश्ता वेळेत मिळत नसल्याने बोंबाबोब होत आहे. जेवनात एकच पोळी दिली जात होती. अधून-मधून दोन पोळया देत आहे. भाजी एका पोळीवर पुरेल इतकी सुद्धा नसते. वरणाची तिच बोंब, दिली जाणारी पोळी व भात हे राशनच्या गहू व तांदळाचे दिले जात असल्याने रुग्णांची खाण्यावाचून परवड होत आहे.

रुग्णांची खाण्यावाचून होणारी हेळसांड गंभीर असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली, तर ठीक अन्यथा कोरोनाच्या संसर्गापेक्षा वेळेत व चांगले जेवन हे रुग्णांना न मिळाल्यामुळे ते मरू शकतील, हे नाकारता येणारे नाही. त्यामुळे प्रशासनाने वेळीच खबरदारी घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे.