सतीश चव्हाण यांच्या प्रचारप्रक्रियेपासून अशोक चव्हाण अलिप्त

राजकारण

 

जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24:- मराठवाडा पदवीधर निवडणुकीची रंगत वाढत चालली असून प्रचारार्थ उमेदवार बैठका, सभा घेत आहेत.नांदेड जिल्ह्यापुरते मात्र या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडी उमेदवाराच्या प्रचारापासून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण अद्याप अलिप्त आहेत.अशोक चव्हाण यांची नाराजी राष्ट्रवादीबद्दल असल्याचे बोलले जात आहे.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा एकदा सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. यासाठी सतीश चव्हाण हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन पदवीधरसोबत बैठका घेत आहे.त्यांच्यासोबत मोजके राष्ट्रवादीचे पदाधिकारी व काही शिक्षक संघटना वगळता शिवसेना तसेच काँग्रेसचा एक पदाधिकारी,आमदार सोबत असल्याचे बघायला मिळालेले नाही.

नांदेड जिल्ह्यात पदवीधर मतदारांची संख्या 50 हजरापेक्षा अधिक आहे.यात काँग्रेसला मानणारा मतदारही बहुसंख्येने आहे.तसे असताना सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारामध्ये काँग्रेस कुठेही सक्रिय असल्याचे बघायला मिळत नाही.काँग्रेसप्रमाणे अद्याप शिवसेना सुद्धा अंतर राखून आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने नेमकी राष्ट्रवादीबद्दल अशोक चव्हाण यांची नाराजीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.इकडे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा नांदेड येथे आज होत असताना महाविकास आघाडीला मात्र येथे लय घेता आलेली नाही.यास अशोक चव्हाण यांची नाराजी मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.प्रा.यशपाल भिंगे यांच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारामध्ये राष्ट्रवादीने शिफारस केली आहे.भिंगे यांच्या नावास अशोक चव्हाण यांचा विरोध असल्याचेही बोलले जात आहे. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने असलेली अशोक चव्हाण यांची नाराजी ही उमेदवार सतीश चव्हाण यांना परवडणारी नसेल.