पुढील काळात अशी असेल लॉकडाऊनची रुपरेषा

नांदेड

नांदेड, बातमी24ः कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शुक्रवार 24 जुलै पासून सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुकाने व इतर खाजगी आस्थापना अटी व शर्तीच्या अधिन राहून (मिशन बिगीन अगेन) सकाळी 7 ते सायं. 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मुभा दिली आहे. मात्र शनिवारी व रविवारी अशी दोन दिवशी संचारबंदी पूर्णवेळ असणार आहे.

मागच्या बारा दिवसांपासनू सुरु असलेली संचारबंदी आज रात्री बारा वाजता उठणार आहे. मागच्या बारा दिवसांच्या काळात प्रशासनाकडून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. त्यामुळे रस्त्यावर येणारी अनावश्यक वाहतुक थांबली, लोकांना दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत घरीच थांबले. बारा दिवसांच्या संचारबंदीनंतर शुक्रवारपासून लॉकडाऊन उडणार आहे.

सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था व शिकवणी वर्ग इ. बंद राहतील. तथापि ऑनलाईन, आंतर शिक्षण यास मुभा राहील. हॉटेल / रेस्टॉरंट आणि इतर हॉस्पिटॅलिटीच्या सेवा हया गृहनिर्माण, आरोग्य, पोलीस, शासकिय अधिकारी, आरोग्य सेवा कर्मचारी, पर्यटकांसह अडकलेल्या व्यक्ती आणि विलगिकरण सुविधेसाठी वापरता येईल. तसेच वरील सेवेसाठीच बसस्टॉप, रेल्वेस्टेशन येथे चालू असलेल्या कॅन्टीनचा सुध्दा वापर करता येईल. रेस्टॉरंटला खाद्यपदार्थाच्या होम डिलेव्हरीसाठी स्वयंपाकघर वापरण्यास मुभा असेल.

सर्व सिनेमा हॉल, शॉपींग मॉल, व्यायामशाळा व जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेंब्ली हॉल व इतर तत्सम ठिकाणे बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्ये, इतर मेळावे आणि मोठया धार्मिक सभा यास प्रतिबंध असेल. सर्व धार्मिक स्थळे, पुजेची ठिकाणे भाविकांसाठी बंद ठेवण्यात येतील. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा इत्यादीवर बंदी राहणार आहे.

संचारबंदी कालावधीत सायं 5 ते सकाळी 7 यावेळेत कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्यावश्यक सेवेकरिता नेमण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय कारणास्तव रुग्ण व त्यांच्यासोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील. यावेळेत विनाकारण फिरतांना आढळल्यास अशा व्यक्तींच्या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.