भावा-बहिणीच्या उत्सवासाठी पोस्ट कार्यालय सज्ज

नांदेड

नांदेड, बातमी24:- बहिण-भावाचा उत्सव असलेल्या राखीचा सण असलेला रक्षा बंधन सोमवार 3 ऑगस्ट रोजी आहे. कोरोनामुळे भावा-बहिणीची भेट अशक्य असल्यास पोस्ट कार्यालय मदतीला धावून येणार आहे. राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे. राख्या वेळेत भावापर्यंत पोहचण्यासाठी टपाल कार्यालयाच्या स्पीड पोस्ट सेवा तत्पर ठेवल्या असून लोकांनी या सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड डाक विभागाचे सहाय्यक अधिक्षक डॉ. बी. एच. नागरगोजे यांनी केले आहे.

यावर्षी कोविडची परिस्थिती लक्षात घेता टपाल विभागाने विशेष नियोजन केले आहे. त्याच शहरात राहणार्‍या भावंडांना कोविड नियंत्रणासाठी असलेल्या व्यवस्थापनामुळे भेट घेणे जीकरीचे ठरेल. कंटेमेन्ट झोन किंवा सीलबंद इमारतींमध्ये कोणाचे भाऊ-बहिणी रहात असतील तर त्यांच्या भावनिक भावबंधाचा विचार करुन पोस्ट ऑफिसचे सर्व कर्मचारी सेवेसाठी तत्पर झाले आहेत.

या कोविड काळात, पोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलन, प्रसार आणि वितरण यास सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे. स्पीड पोस्ट राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवनात होईल आनंद अशी घोषणा घेऊन पोस्ट ऑफिस तत्पर असल्याचेही सहाय्यक अधिक्षक डॉ. नागरगोजे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.