नांदेड, बातमी24ः राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दि. 30 जुलै रोजी काढण्यात आलेल्या एका आदेशाची होळी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. या वेळी सदरचा आदेश रद्द करण्याची मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याच जिल्ह्यातील कंत्राटदारांनी निर्णयाची होळी केल्याबद्दल या आंदोलनाला विशेष महत्व आले होते.
सोमवार दि. 10 ऑगस्ट रोजी नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंडळ कार्यालयासमोर नांदेड, हिंगोली व परभणी येथील बिल्डर्स असोसिएशनचे पदाधिकारी एकत्र आले होेते. दि. 30 रोजी घेतलेला निर्णय या विभागात काम करणार्या कंत्राटदारांना देशद्रोही ठरविणारा आह. त्याचसोबत या निर्णयात अनेक काही जाचक अटी घातल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कंत्राटदार हे समान अंग आहेत. कंत्राटदारांकडून चांगले कामे केली जातात. नियमांचे पालन करण्याचे काम होत असताना शासनाने कंत्राटदारांची बदनामी करण्याच्या हेतूने तसा शासन निर्णय काढला आहे. या निर्णयाचा आम्ही सगळे तीव्र शब्दात निषेध करतो, असे बिल्डर्स असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबूराव शक्करवार यांनी नमूद केले. त्यामुळे सदरचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
या वेळी माणिकराव हेंद्रे, सुधीर पाटील, मयूर कयाल, नरेश पैंजणे, दिलीप बाळकर, ए.एम. हकीम, व्ही.व्ही. मामीडवार, अविनाश रावळकर, मनोज मोरे, दीपकसिंह फ ौजी, एन.एस. शेट्टी, माधवराव एकलारे आदींची उपस्थिती होती.