जिल्ह्यातील ती 22 कंत्राटीपदाची पदभरती प्रक्रिया रद्द

महाराष्ट्र

नांदेड, बातमी24:- किनवट येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय सुरु करण्यासाठी मंजूरी प्रदान केलेली होती. या समितीसाठी आवश्यक मनुष्यबळ कंत्राटी तत्वावर पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली होती. मात्र ही पदभरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यात अधिकारी स्तवरील पदाच्या मुलाखती झाल्या होत्या व कारकून पदाचे अर्ज ही स्विकारण्यात आले होते. ही पदभरती रद्द करण्यात आल्याने अनेकांची हिरसमोड झाली आहे.

आदिवासी विकास विभागाचा शासन निर्णयान्वये नांदेडयात अधिकारी / कर्मचारी यांची एकूण 22 पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यासंदर्भात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार विधी अधिकारी, विधी समन्वयक, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी व संशोधन सहायक या पदांसाठी येणार्‍या उमेदवारांच्या मुलाखती झाल्या होत्या. तसेच लिपीक टंकलेखक, माहिती तंत्रज्ञान तथा संगणक सहायक, लघुटंकलेखक, शिपाई व सफाईगार या पदांसाठी येणार्‍या उमेदवारांचे अर्ज स्विकारण्यात आले होते.

राज्यातील कोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामुळे वित्तीय उपाययोजनेच्या अनुषंगाने शासनाने चालु वित्तीय वर्षात सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग वगळता कोणत्याही विभागाने प्रकारची नवीन पदभरती करु नये, याबाबत सुचित केलेले आहे. त्यामुळे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, किनवट येथील कंत्राटी पदभरती रद्द करण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे. अशी माहिती औरंगाबाद अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडून सांगण्यात आले.